

Shopping day! Crowds throng the market on the occasion of Diwali
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीच्या संकटातून सावरत असलेल्या बाजारपेठेत रविवारी (दि.१९) दिवाळीनिमित्त खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली. सुटीचा दिवस असल्याने अगदी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये नवीन कपडे, मिठाई, लायटिंग, आकाशकंदील, फटाके, रांगोळीसह विविध साहित्य आणि फराळ खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली. दुपारनंतर बाजारात तुफान गर्दी वाढल्याने अनेक मार्गावर कॉडी झाली. सायंकाळी मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर पाय ठेवता येईल एवढीही जागा नव्हती. त्यामुळे दिवाळी आधीचा कालचा रविवार हा खरेदीवार ठरला.
दीपावली म्हणजे, आनंद, उत्साह आणि चैतन्याचा सण. समाजातील सर्वच वर्गामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यामुळे बाजारपेठेलाही नवी उभारी मिळत असल्याने लहान-मोठे व्यापारी, व्यावसायिक सर्वच जण दरवर्षी मोठ्या आतुरतेने दिवाळीची प्रतीक्षा करत असतात. यंदा मात्र अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी हवालदील झाल्याने नवरात्र-दस-याला बाजारपेठेलाही फटका बसला होता.
दरम्यान, शासनाकडून शेतकऱ्यांना मदत आणि कामगारवर्गाला कंपन्यांकडून बोनस मिळाल्याने दिवाळीच्या खरेदीला जोर आला आहे. बाजारात रंगरंगोटी, सजावटीच्या साहित्यांसह नवीन कपडे, फराळ, किराणा साहित्य, आकाश कंदील, विद्युत दिवे-माळा, पणत्या, रांगोळी आणि गृहउपयोगी वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यातच कालचा रविवार हा दिवाळी आधीचा सुटीचा वार असल्याने बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली. रात्री उशिरापर्यंत खरेदीची लगबग सुरू असल्याने दिवसभरात मोठी उलाढाल झाली. यामुळे व्यापारीवर्गही चांगलाच सुखावला.
सुटीचा दिवस असल्याने नोकरदारवर्ग सकाळी सहकुटुंब विविध वस्तु, साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने शहरातील पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, निरालाबाजार, औरंगपुरा, मच्छलीखडक, रंगारगल्ली, सराफा रोड, शहागंज, चेलिपुरासह विविध भागांतील दुकानांवर रेडिमेड कपडे, टीव्ही, फौजसह गृहउपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वस्तू खरेदींसाठी ग्राहकांची लगबग सुरू होती, विविध मॉलमध्येही तोबा गर्दी दिसून आली. सुटीचा दिवस सत्कारणी लावत फटाके खरेदीचा बारही उडवला.