

city president Chhawa murdered love affair body thrown Godavari River
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रेम प्रकरणातून छावा संघटनेच्या एका गटाच्या शहराध्यक्षाचा त्याच गटातील माजी महिला पदाधिकारी असलेल्या प्रेयसीने साथीदाराच्या मदतीने कॅनॉट प्लेस भागातील फ्लॅटमध्ये ३१ जुलैच्या रात्री चाकूने गळा चिरून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी मृतदेह वाहनातून गोदावरी नदीपात्रात फेकून दिला. तब्बल १२ दिवसांनी शेवगाव-पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंगी येथे कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मृतदेह आढळून आला.
सचिन पुंडलिक औताडे (३२, रा. कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हसूल) असे मृताचे नाव असून ते छावा संघटनेच्या एका गटाचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी सोमवारी (दि.१८) अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी एका छावा संघटनेच्या माजी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा भारती रवींद्र दुबे पाटील (रा. फ्लॅट क्र २०१, कॅनॉट प्लेस) आणि तिचा साथीदार दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद, कान्होबा ता. खुलताबाद) यांना अटक केली. भारतीने आरोपी अफरोज खान (रा. कटकटगेट) याला फ्लॅटवर बोलावून घेत सचिनचा चाकूने गळा कापून खून केला. अफरोजच्या कारमधून मृतदेह पैठण भागात नेऊन गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याची कबुली दिली.
फिर्यादी राहुल पुंडलिक औताडे (३५, रा. कोलठाणवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ मृत सचिन हा ३१ जुलैला दुपारी घरातून दुचाकी घेऊन निघाला होता. मात्र तो घरी परतला नसल्याने हसूल पोलिस ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी मिसिंग दाखल करण्यात आली होती. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंगी येथील गोदावरी नदीपात्रात कुजलेला मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. मृताच्या मानेवर भक्ती, असे गोंदलेले होते.
कुटुंबीयांनी जाऊन पाहिले तेव्हा तो सचिनचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक प्रवीण महाले यांनी तपास सुरू केला. दरम्यान, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार फुरखान शेख, बाळासाहेब नागरगोजे, गुंजाळ, खेडकर, आतार, राठोड, धुळे व सारिका दरेकर यांचे पथक नेमले. पथकाने चार दिवस सखोल तपास करून सोमवारी बुलढाणा येथून आरोपी दुर्गेश तिवारी आणि भारती दुबे दोघांना अटक केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन औताडे आणि भारती दोघांमध्ये संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. भारतीच्या मावस भावाचा मुलगा दुर्गेश हाही तिथेच होता. त्यानंतर भारतीने आरोपी अफरोज खानला बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनी सचिनचा चाकूने गळा कापून मानेवर वार करून निघृण खून केला. अफरोजच्या कारमधून मृतदेह पुलावरून गोदावरी नदी पात्रात फेकून दिला. चाकू आणि रक्तानी माखलेल्या कपड्याची विल्हेवाट लावली.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, मृत सचिनचे आरोपी भारती दुवे सोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तसेच भारती इतर पुरुषांसोबतही फिरत असल्याने सचिन आणि भारतीमध्ये नेहमी वाद होत होते. सचिन आणि भारती यांचा मित्र प्रशांत महाजन याने राहुल यांना सांगितले की, ३१ जुलै रोजी दुपारी सचिन आणि भारती हे तिच्या गाडीतून जालना येथे लग्नासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर कॅनॉट येथील फ्लॅटवर दोघे दारू प्यायले होते, अशी माहिती दिली.