

आडूळ (पैठण) : पैठण तालुक्यातील दरेगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना घडली आहे. वन्यप्राण्यांपासून मक्याच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणातील विजेच्या प्रवाहाचा धक्का लागून एका २५ वर्षीय तरुण विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मी सखाराम मैद असे मृत महिलेचे नाव असून, ही घटना सोमवारी (दि. १८) सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नेमके काय घडले?
आडूळ आणि परिसरातील शेतकरी सध्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहेत. रानडुक्कर, हरीण आणि इतर प्राणी शेतातील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच समस्येला कंटाळून दरेगाव शिवारातील गट क्रमांक ९४ मधील शेतकरी रुखमण रामकिसन मैद यांनी आपल्या मक्याच्या पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी शेताच्या बांधावर तारेचे कुंपण करून त्यात विजेचा प्रवाह सोडला होता.
रविवारी रात्री शेतकऱ्याने कुंपणाला करंट जोडून ठेवले होते.
सोमवारी सकाळी ७:३५ वाजता महावितरणचा वीजपुरवठा सुरू झाला आणि तारेच्या कुंपणात वीजप्रवाह उतरला. सकाळी ८:३० च्या सुमारास त्याच परिसरातील लक्ष्मी सखाराम मैद (वय २५) या प्रातर्विधीसाठी शेताकडे गेल्या असता, त्यांचा नकळतपणे या जिवंत तारेला स्पर्श झाला. रविवारी मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरू असल्याने जमिनीत ओलावा होता. त्यामुळे विजेचा धक्का इतका तीव्र होता की, लक्ष्मी यांचा जागीच मृत्यू झाला.
परिसरात हळहळ, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
घटनेनंतर आरडाओरड होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. लक्ष्मी यांना तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी ५ वाजता दरेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, सासू-सासरे असा परिवार आहे.
या घटनेमुळे वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव आणि त्यातून शेतकऱ्यांनी उचललेली धोकादायक पावले, हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिकांचे संरक्षण करताना मानवी जीव गमावला जाण्याची ही घटना अत्यंत वेदनादायी असून, प्रशासनाने यावर तातडीने सुरक्षित उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.