

The Cambridge to Seven Hills road will be 60 meters wide.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत सिडको चौकापासून सेव्हनहिलपर्यंत रस्त्यांची रुंदी ६० मीटरवरून ४५ मीटर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आता या ठिकाणीदेखील ६० मीटर इतकेच रुंदीकरण होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री संजय शिरसाट आणि महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली आहे. रस्ता रुंदीकरण मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव होणार नाही, असेही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा घेतला. बैठकीनंतर पालकमंत्री शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला.. शहरात जे काही अतिक्रमणे काढली जात आहेत, त्यात लोक सहकार्य करत आहेत. परंतु कुठेही चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढत नाही ना याचा आढावा घेतला. रस्ते रुंद होताहेत याबद्दल लोकांनी मनपाचे अभिनंदन केले. अतिक्रमण काढताना, ज्या लोकांकडे परवानगी आहे. अशा लोकांना विश्वासात घेऊन, नोटीस देऊन अतिक्रमणे काढावीत. शहरात जे रस्ते रुंद होतील, त्यासाठी निधी लागणार आहे. शहरातून जाणार्या तीन राष्ट्रीय महामार्गासाठी अकराशे कोटी रुपये लागणार आहेत. हा निधी देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केले आहे. त्याचा डीपीआर बनविण्यास सांगितले आहे. दहा दिवसांत हा डीपीआर बनणार आहे, असेही शिरसाट म्हणाले.
पाडापाडीतील भेदभावाबद्दलच्या प्रश्नावर शिरसाट म्हणाले, अलाईनमेंटचे काही प्रॉब्लेम आहेत, त्यासाठी मनपा आयुक्त पुन्हा तिथे भेट देणार आहेत. रस्त्याची सेंटर पॉइंट पुढे मागे झाली आहे, म्हणून त्याची व्यवस्थित मोजणी केली जाईल. नगर रचना आणि टिएलआरचे लोक ही मोजणी करतील.
मार्किंग झाल्यावर कोण श्रीमंत कोण गरीब काही बघितले जाणार नाही, जे मार्किंग होईल आणि त्यात जे येतील त्या सर्वांच्या इमारती पाडल्या जातील. सिडको चौक ते सेव्हनहिल या दरम्यान रुंदी कमी झालेली नाही, नियमानुसारच होईल, असेही शिरसाट यांनी सांगितले.
विकास आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. सेव्हनहिल ते सिडको चौक हा रस्ता ६० मीटरच होणार आहे. परंतु या ठिकाणच्या मालमत्तांना रीतसर परवानगी दिलेली आहे. त्यामुळे या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ती प्रक्रिया करूनच रुंदीकरण केले जाईल, कुठेही भेदभाव होणार नाही, असेही मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
रस्ता रुंदीकरणात अनेकांची घरे गेली आहेत. ते बेघर झाले आहेत. आम्ही म्हाडाकडून १०५ घरे मनपाकडे घेणार आहोत. ज्यांचे घरे गेली आहेत, त्यांना ही घरे येत्या १० ऑगस्टपर्यंत देण्याचा आमचा संकल्प आहे. या घराची किंमत ११ लाख रुपये इतकी आहे ते एक लाखात देण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी काही दानशूर व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. दुसरीकडे जटवाडा रोडला गोल्फ मैदानासाठी ७८ हेक्टर जमीन राखीव आहे. त्यातील काही जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल. त्यापैकी काही जागा २० बाय ३० चे भूखंड करून या लोकांना दिले जातील. तसेच काही जागा म्हाडाला देऊन त्यावर गृह प्रकल्प उभारला जाईल. त्यातही ५ टक्के घरं बाधितांसाठी राखीव ठेवली जातील, असेही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.