

Kharif crops loss due to lack of rain
शेंदूरवादा, पुढारी वृत्तसेवा :
शेंदूरवादा (ता. गंगापूर) परिसरात महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरात पीक वाढीसाठी अनुकूल वातावरणही निर्माण झाल्याने सध्या पाऊस न आल्यास त्या पिकांतून उत्पादनात कमालीची घट येण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. येत्या पाच सहा दिवसांत पाऊस आल्यास कोरडवाहू हलक्या जमिनीतील पीक मोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकर्यात धास्ती पसरली आहे.
मागील वर्षी परिसरात सातत्याने अतिवृष्टी परिस्थितीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर या वर्षी दीर्घ पावसाच्या उसंतीने मीठ चोळल्या गेले आहे. मागील दोन वर्षात अतिवृष्टीमुळे खरीप तर बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना जबर हादरे बसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. शेंदूरवादासह तालुक्यातील अल्प अत्यल्प भूधारकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे आतापर्यंत या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पार ढवळून निघाली होती.
यावर्षी पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे बडे शेतकरीही हादरले असल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षात अतिवृष्टी गारपिटीच्या तडाख्यातही परिसरातील सोयाबीन, कापूस हरभऱ्याचे समाधानकारक उत्पादन शेतकऱ्यांनी हिकमतीने काढले होते. परंतु, बाज-ारात सर्वच शेतमाल बेभाव विकल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटात उभे राहण्याची आर्थिक क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याची चित्र पाहायला मिळत आहे.
दादासाहेब यांना पाच एकर क्षेत्रावर कापूस लागवडीसाठी २५ ते ३० हजार रुपये इतका खर्च आला. यावेळी कापसातून अधिक प्रमाणात उत्पादन होईल, अशी अपेक्षा दिवे यांची होती. मात्र कापूस मान टाकू लागल्यामुळे त्यांना दोन वेळेस टँकरने पाणीही द्यावे लागले. पुढील दोन दिवसांत जर पावसाने हजेरी नाही लावली तर त्यांनी संपूर्ण लागवड केलेल्या पिकाचे नुकसान होईल आणि त्यांच्या हाती लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणे मुश्कील होणार आहे. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची असताना अशातच महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या नोटीस दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
आता पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या चारा पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाचे आडीच महिने पूर्ण झाले. आता पुढील दीड महिन्यात काय होईल, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.