

The administration has started repairing Bibi Ka Maqbara
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दखनचा ताज म्हणून ओळख असलेल्या बीबी का मकबऱ्यासह त्यांच्या परिसरातील संरक्षक भिंतीही काळवंडल्या आहेत. याची रंगरंगोटी करून परिसरालाही झळाळी देण्याचे काम वेगात सुरू असून, घुमटाची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावरही पुरातत्व विभाग लक्ष देत असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या सूत्रांनी दिली.
बीबी का मकबऱ्याकडे पर्यटकांचा कल मोठ्या प्रमाणात आहे. येथे देश विदेशांतून पर्यटक बीबी का मकबऱ्याला भेट देतात. मकबऱ्याच्या सौंदर्यात आ लेली कमी आणि घुमटाची जागोजागी झालेली पडझड यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत होता. याचा परिणाम पर्यटकांच्या घटत्या संख्येत होत होता.
ही बाब पुरातत्व विभागाने गांभीर्याने घेत आता मकबऱ्याच्या संरक्षक भिंतींना झळाळी देण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान यापूर्वी मकबऱ्याचे सौंदर्य जपण्यासाठी मुख्य गाभार्याची देखभाल दुरुस्ती हाती घेतली होती. हे काम संपल्यानंतर संरक्षक भिंती व आतील काही भागांत रंगरंगोटीचे काम करण्यात येत आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मकबरा परिसरात वेटिंग रूम, स्वच्छतागृह, लॉकर सुविधा, वाचनालय अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचबरोबर आणखी काही सुविधा उपलब्ध करून देता येईल का याचाही आढावा घेण्यात येत असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या सूत्रांकडून समजली.