

Sambhajinagar Encroachment Campaign
जालना रोड : आता लक्ष पाडापाडीकडे छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : जालना रोड हा सेव्हनहिलपासून केंब्रीज चौकापर्यंत ६० मीटर रुंदीचा आहे. तर सेव्हनहिल ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत हा रस्ता ४५ मीटर रुंद आहे. परंतु महापालिकेने सर्व्हिस रोडच्या नावाखाली केवळ केंब्रीज चौक ते एपीआय कॉर्नरपर्यंतच बेकायदा बांधकामांची पाडापाडी केली. मात्र तेथून पुढे सेव्हनहिलकडे जाणाऱ्या मार्गावरील धनधांडग्यांच्या जागांना संरक्षण देण्यात आले होते. एमआयडीसीने दोन दिवसांपूर्वीच या सर्व जागांवर मार्किंग केली आहे.
शहराचे मुख्य प्रवेशद्वारापासून ते शहराच्या आत प्रवेश करेपर्यंत ठिकठिकाणी वाहनधारकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने पोलिस बंदोबस्तात हे प्रमुख मार्ग सुसज्ज करून भविष्यात वाहतुकीला येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे.
आतापर्यंत महापालिकेने महानुभव आश्रम चौक ते नक्षत्रवाडी, महानुभव आश्रम ते देवळाई चौक, केंब्रीज चौक ते एपीआय कॉर्नर, पडेगाव ते शक्तिधाम आणि दिल्लीगेट ते हसूल गाव रस्त्यांवर पाडापाडी करण्यात आली. परंतु यात जालना रोडवरील कारवाईमध्ये महापालिकेने गरिबांना एक न्याय आणि धनधांडग्यांना दुसरा न्याय दिल्याचा आरोप होत आहे.
यावरून अनेकांनी महापालिकेच्या कारवाईवर संशय व्यक्त केला होता. मात्र महापालिका प्रशासकांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलावून ६० मीटर रुंदीतील बांधकामांची मार्किंग करणे आणि त्या काढण्यासाठी सूचना करणे, असे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने नुकतीच सिडको चौक ते सेव्हनहिलदरम्यान दोन्ही बाजूंनी ६० मीटरमध्ये येणाऱ्या मालमत्तांवर मार्किंग केली. आता नागरिकांचे लक्ष हे पाडापाडीकडे लागले आहे.