

The 43rd anniversary celebration of Mahatma Gandhi Mission
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी मिशनचा ४३ वा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि.२१) एमजीएम स्टेडियमवर अत्यंत दिमाखात आणि हर्षोल्हासात साजरा झाला. यावेळी महात्मा गांधी मिशनचे पदाधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक आदी हजारो लोकांनी मेणबत्तीचा प्रकाश करत मआओ उजाला करेंफ्चा संदेश दिला.
या सोहळ्यास विचारमंचावर मुख्य अतिथी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तथा प्रख्यात साहित्यिक दामोदर मावजो, जन स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजय कंवल, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त डॉ. सुधीर कदम, विश्वस्त उज्ज्वल कदम, विश्वस्त डॉ. अमरदीप कदम, शिक्षणतज्ञ भाऊसाहेब राजळे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ आदी उपस्थित होते.
यावेळी, मावजो यांनी उपस्थितांशी संवाद साधला. माझ्याकडे सांगण्यासारखे जे काही आहे ते मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असतो. जे काही सांगायचे असते ते मी कोंकणीतून सांगत असतो. मात्र आज अधिक लोकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने मी मराठीमध्ये बोलत आहे. आजचे शिक्षण विद्यार्थ्याला शहाणे बनवते का, याचा विचार होणे आवश्यक आहे.
आजच्या घडीला समाज व्यवस्थेतील भ्रष्टाचार, लाचलुचपत आणि त्याहून विषमता व भेदाभेद हे दुर्गुण वाढलेले दिसतात, याचे कारण आपल्या शिक्षणातील त्रुटी आहेत, असे ज्ञानपीठकार दामोदर मावजो यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . शिव कदम आणि डॉ. योगीता महाजन यांनी केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नियतकालिके, अहवाल आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
सत्याचा मार्ग कठीण : कमलकिशोर कदम
महात्मा गांधी मिशनच्या विश्वस्तांनी आयुष्यभर कष्ट करून उभे केलेले कार्य पुढील पिढीने अधिक भक्कमपणे पुढे नेणे आवश्यक असून, गांधी विचार आपण किती पुढे घेऊन जातो हे अधिक महत्त्वाचे आहे. सत्याचा मार्ग सोपा वाटला तरी तो कठीण आहे; मात्र त्या मार्गान चालण्याशिवाय पर्याय नाही. शिक्षणाला तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा समाजाप्रती असलेली जबाबदारी आपण पार पाडतो, असे एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम म्हणाले.