

New technology for waste collection in the city.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेने गुजरात येथील वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीला कंत्राट दिले आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून ही कंपनी प्रत्यक्ष कामकाज सुरू करणार असून, त्याआधी शहरातील घरांचा सखोल सर्वेक्षणाचा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
कंपनीचे कर्मचारी सध्या वसाहतींमध्ये फिरून गुगल लोकेशनसह घरांचे फोटो घेत आहेत. घंटागाडीचे मार्ग (रूट) आणि कॉलनीतील थांबे (पॉइंट) निश्चित करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या सात वर्षांपासून हैदराबाद येथील रेड्डी कंपनी शहरातील कचरा संकलनाचे काम करत असून, त्यांचा करार जानेवारी २०२६ पर्यंत आहे. मात्र १ फेब्रुवारीपासून नवीन कंत्राटदार म्हणून वेस्टर्न इमॅजिनरी कंपनी कामकाज हाती घेणार आहे.
अहमदाबाद, राजकोट, वडोदरा आदी शहरांतील कामाचा अनुभव, तेथील निकाल आणि निविदेतील दर लक्षात घेऊन कंपनीची निवड करण्यात आली आहे. काम सुरू करण्यापूर्वी शहराचा जाता कचरा सविस्तर सर्व्हे करून नियोजनावर भर देण्यात आला आहे.
शहरात सुमारे ३ ते सव्वातीन लाख मालमत्ता आहेत. यासाठी कंपनीने गुजरातमधून ३० ते ३५ कर्मचारी आणले असून, स्थानिक युवकांनाही सर्वेसाठी सहभागी करून घेतले आहे. सर्वेक्षणासाठी मोबाईल अॅप दिले असून, त्याद्वारे माहिती संकलित केली जात आहे.