

Testing of new water purification plant in Farola finally successful
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फारोळा जलशुद्धीकण केंद्रात ९०० मि.मी. जलवाहिनीसाठी व्यासाच्या नव्याने २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून या केंद्रात सुरू असलेली पाण्याची चाचणी शुक्रवारी रात्री यशस्विरीत्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेची तपासणी केल्यानंतर येत्या १५ ऑगस्टपासून शहराला अतिरिक्त २६ एमएलडी पाणीपुरवठा सुरू करणार आहे, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपेंद्र कोराटे यांनी शनिवारी (दि. ९) केला.
शहरवासीयांना मुबलक पाणीप-रवठा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अमृत २ योजनेतून २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. यात शहरासाठी नवीन २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करून शहराला २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यापूर्वी शहरातील पाण्याचे टप्पे कमी करण्यासाठी नव्याने टाकलेल्या ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात नवीन २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे.
या केंद्रातून मागील तीन दिवसांपासून पाणी शुद्धीकरणाची चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी शुक्रवारी (दि. ८) रात्री यशस्विरीत्या पूर्ण झाल्याची माहिती उपअभियंता प्रदीप चारवे यांनी दिली, असे एमजेपीचे कार्यकारी अभियंता दीपेंद्र कोराटे सांगितले. तसेच चाचणी पूर्ण झाल्याने आता जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या शुद्धतेची तपासणी होणार आहे. या तपासणीनंतरच शहराच्या दिशेने अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता १५ ऑगस्टपासून शहरवासीयांना मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून अतिरिक्त २६ पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असा दावा कार्यकारी अभियंता कोराटे यांनी केला.
चाचणीने शहराचे पाणी पळवले
फारोळ्यात अगोदर जलशुद्धीकरण केंद्राला पाईप जोडण्यासाठी त्यानंतर चाचणीसाठी शहरवासीयांना वेठीस धरले जात आहे. या प्रक्रियेमुळे मागील आठवडाभरापासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे. अनेक भागांचे वेळा-पत्रकही कोलमडले आहे.
चार दिवसांआड मिळेल पाणी
९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून सध्या २० एमएलडी तर जुन्या ७०० आणि १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ११८ असे एकूण १३८ एमएलडी पाणी शहराला मिळत आहे. त्यावर सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. परंतु, आता ९०० मि.मीतून अतिरिक्त २६ एमएलडी पाणी मिळाल्यास शहरात १६४ एमएलडी पाणी दाखल होईल. त्यामुळे शहरवासीयांना पाचदिवसांआड ऐवजी तीन दिवसांआड म्हणजेच चौथ्या दिवशी पाणी देणे शक्य होणार आहे. त्यासाठी अतिरिक्त २६ एमएलडी पाणी मिळणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.