

Brother dies in accident on Raksha Bandhan day
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : रक्षाबंधनाचा आनंदाचा दिवस काळाने हिरावून घेतल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली. वैजापूरङ्कगंगापूर रोडवर पिकअप ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि.८) शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. किरण सुदाम पेटारे (वय २५, रा. खंडाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर गंगापूर रोडवरील महालगाव जवळील पंचगंगा साखर कारख्यान्याजवळ शुक्रवारी रात्री वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव पीकअप गाडीनेदुचाकीवर स्वार असलेला किरण पेटारे याच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात किरणला गंभीर दुखापत झाली.
अपघात होताच उपस्थित आजूबाजूच्या नागरिकांनी किरण याला वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अपघात एवढा भीषण होता की, यात दुचाकीचा पूर्ण चक्काचूर झाला होता. या घटनेची वीरगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबाचा आक्रोश
किरणच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी पोहोचताच वातावरण शोकमग्न झाले होते. आईने मुलाचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला, राखी बांधण्यासाठी आपला भाऊ या जगात नसल्याने बहिणीणे सुध्दा हंबरडा फोडला.