Chhatrapati Sambhajinagar News : एकच काम, दोघांना मिळणार दाम

जलसंपदातील घोटाळे : एकाच कामाच्या दोन निविदा, दुरुस्तीवर होणार जितका खर्च तितक्यात आल्या असत्या नव्या वस्तू
irrigation department corruption
irrigation department corruptionpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जलसंपदात मर्जीतील ठेकेदारांना पोसण्यासाठी अधिकारी काय करतील याचा नेमच राहिलेला नाही. जलसंपदाच्या नांदूर मधमेश्वर कालवा विभाग दोनमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला. या विभागाने नुकत्याच एकाच कार्यालयातील, एकसारख्याच कामाच्या दोन वेगवेगळ्या निविदा काढल्या. हे काम दोन वेगवेगळ्या ठेकेदारांना दिले. विशेष म्हणजे ज्या वस्तूंच्या दुरुस्तीसाठी जितक्या रकमेचे हे काम काढण्यात आले आहे, तितक्या रकमेत दुरुस्तीऐवजी त्या वस्तूच नव्या खरेदी करता आल्या असत्या.

मिळालेल्या कागदपत्रानुसार, जलसंपदाच्या नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र. 2 ने काढलेल्या या दोन्ही निविदांचे विषय हे प्रादेशिक कार्यालयातील तांत्रिक शाखा, भांडार शाखा तसेच निविदा शाखा येथील दस्तावेज ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या लाकडी कपाटांची दुरुस्ती करणे तसेच इलेक्ट्रिक वायरिंग करणे, स्थापत्य घटकांची दुरुस्ती करून रंगकाम करणे व इतर अनुषंगिक कामे. असा आहे. यातील ई- निविदा सूचना क्र. 05 (04) सन 2025-26 चा अंदाजपत्रकीय दर 10 लाख 13,285 तर दुसरी ई- निविदा सूचना क्र. 05 (05) सन 2025-26 चा अंदाजपत्रकीय दर 10 लाख 15,480 ठेवण्यात आला होता.

irrigation department corruption
Sambhajinagar News : निविदा मागे घेण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींच्या नावे दबाव

या दोन्ही निविदा 28 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. 27 फेबुवारी रोजी एकदाच त्या उघडण्यात आल्या. 05 (04) क्रमांकाच्या निविदेत अशिष पवार हे ठेकेदार पात्र ठरले. त्यांना 8 लाख 30,995 रुपयांत हे काम मिळाले. तर 05 (05) या निविदेत दिनेश आहेर हे पात्र ठरले. त्यांना 8 लाख 93,622 दराने काम मिळाले.

वास्तविक एकाच कार्यालयात, एकाच ठिकाणी लाकडी कपाट दुरुस्ती, रंगकाम आणि वायरिंगची दुरुस्तीमध्ये नेमके असे काय वेगवेगळे ॲटम आहेत आणि अर्ध कपाट एक ठेकेदार आणि अर्ध कपाट दुसरा ठेकेदार दुरुस्त करणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दुरुस्तीच्या खर्चात तर नवीन वस्तू येतील

या दोन्ही निविदांमध्ये इलेक्ट्रिक वायरिंग दुरुस्ती, लाकडी कपाटांच्या दुरुस्ती व रंगकामांचा समावेश आहे. दोन्ही निविदांचे एकूण अंदाजपत्रक 20 लाख 28 हजारांचे होते. आता दोन्ही कामे दोन ठेकेदारांना सुमारे साडे सतरा लाखांमध्ये देण्यात आली. वास्तविक पाहता लाकडी कपाटांची दुरुस्ती, वायरिंग बदल नव्हे केवळ दुरुस्ती व यावर जितका खर्च होतोय, तितक्या रकमेच हे सर्व साहित्य नवीनही आले असते. मग असे असताना काढण्यात आलेल्या या निविदा म्हणजे केवळ ठेकेदार पोसण्यासाठी केलेला हा उद्योग आहे, असा आरोप आता होत आहे.

irrigation department corruption
Sangli News : महापालिकेचे 500 कोटींचे भूखंड वाऱ्यावर

निविदाबाबत संशय का?

या दोन्ही निविदांचा विषय एकच आहे, कामही एकच आहे. विशेष म्हणजे एकाच कार्यालयात ही कामे करायची आहेत. सारखेच काम, एकच कार्यालय मग निविदा दोन का? बर दोन कामे एकत्र करून ती एकाच ठेकेदाराकडून का नाही केली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news