

Teacher, student die after drowning in Jogeshwari kund
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ येथील जोगेश्वरी कुंडात रविवारी (दि. २४) बुडणाऱ्या विद्यार्थ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचाही मृत्यू झाला. राजवर्धन अशोक वानखेडे (३०, रा. किनोळा, ता. चिखली, जि. बुलढाणा ह.मु.इटखेडा छत्रपती संभाजीनगर), चेतन संजय पगडे (१७, रा. इटखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इटखेडा येथील एका कोचिंग क्लासेसचे काही विद्यार्थी रविवारी (दि २४) वेरूळ लेणी परिसरात सकाळी सहल घेऊन आले होते. यामध्ये चार मुली व दोन मुले होती.
हे सर्व जण वेरूळ लेणी डोंगरातील जोगेश्वरी कुंड परिसरात फिरत असताना चेतन पगडे या विद्यार्थ्याचा पाय घसरून तो कुंडात पडला. कोचिंग शिक्षक राजवर्धन वानखेडे हे त्याला वाचवण्यासाठी कुंडातील पाण्यात उतरले मात्र दुर्दैवाने यात दोघेही कुंडातील पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली असता स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. दोघांही वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पुढील तपास पोलिस आव्हाड करत आहे.
जोगेश्वरी कुंडात २७ जुलै छत्रपती संभाजीनगरातील नागसेननगर येथील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सदरील घटना ताजी असतानाही याच ठिकाण परत दुसरी घटना घडली. मध्यंतरी याच कुंडामध्ये एक गाय पडली होती, तिला स्थानिक नागरिकांनी वर काढले. अशा घटना जोगेश्वरी कुंडाकडे वारंवार होत असल्याने येथील सुरक्षारक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.