

Surat pattern of drug syndicate busted; Medical Shop Owner and Agent Jailed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या ड्रग्ज सिंडिकेटला माल पुरवठा करणारे नेटवर्क अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) उद्धवस्त केले. साडेचार हजार बटन गोळ्यांसह दोन पेडलर्सला पकडल्यानंतर एएनटीएफच्या पथकाने गुजरातमध्ये बसून नशेच्या गोळ्या आणि सिरपचे जाळे विणणाऱ्या मुख्य एजंटसह एका मेडिकल चालकाला सुरतमधून बेड्या ठोकल्या.
अजमत अहेमद बेग (२४, रा. न्यू नंदनवन कॉलनी, चांदमारी, ह.मु. सुरत) आणि मेडिकल चालक रमेशकुमार गोमाराम चौधरी (३५, रा. राजस्थान, ह.मु. सुरत) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती एएनटीएफचे उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि.२१) एएनटीएफच्या पथकाने सापळा लावला. ट्रॅव्हल्सने सुरतहून नशेचा माल घेऊन आलेला सय्यद अझर सय्यद अकबर (२६, रा. चांदमारी) हा पोलिसांची चाहल लागताच २ हजार गोळ्या आणि ११४ सिरपच्या बाटल्या टाकून पसार झाला होता.
त्याला पथकाने सोमवारी (दि.२३) बेड्या ठोकल्या. सय्यद अझर हा कुख्यात ड्रग्ज माफिया अंधा फिरोजचा भाऊ असल्याचे निष्पन्न झाले. अझरच्या चौकशीतून त्याचा नातेवाईक तौफिक रशीद अली याचे नाव समोर आले. घाटी रुग्णालयासमोर सापळा लावून तौफिकला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे २ हजार ४०० गोळ्या आणि सिरप सापडले.
दोघांच्या चौकशीत या संपूर्ण रॅकेटचे सुरत कनेक्शन उघड झाले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजित टिके, उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक दिपाली पाटील यांच्या पथकाने केली. तपासात आणखी काही बड्या माशांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सहा वर्षांपासून सुरतमध्ये ठिय्या
मुख्य आरोपी अजमत बेग मुळचा छावणीतील चांदमारी भागातील आहे. २०२१ मध्ये त्याने शहरातील ड्रग्ज सिंडिकेटला माल पुरवण्यासाठी सुरत गाठले. अनेक नशेखोरांच्या टोळ्यांचे प्रमुख त्याच्या संपर्कात होते. तो सुरतच्या मेडिकल चालकांकडून माल घेऊन रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात पुरवठा करत असल्याचे समोर आले.
मेडिकलमधून नशेचा बाजार
अजमतने सुरतमधील केअर फार्मसीचा चालक रमेश चौधरी याला जादा पैशाचे आमिष दाख-वून जाळ्यात ओढले होते. रमेश हा औषध वितरकांकडून (डिस्ट्रिब्युटर) नशेच्या गोळ्या कोणत्याही बिलाशिवाय खरेदी करत असे. रेकॉर्डवर कोणतीही नोंद नसल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाला याचा पत्ता लागत नव्हता. विना-बिल घेतलेला हा साठा अजमतमार्फत छत्रपती संभाजीनगरच्या सिंडिकेटला पुरवला जात होता. यापूर्वीच्या ड्रग्जच्या कारवायांमध्ये हेच पुरवठादार असण्याचा अंदाज आहे.