

Sukre raids illegal medical facilities in the Ghati Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटीत अवैधरीत्या सुरू असलेल्या औषधी दुकानावर गुरुवारी (दि.१३) सायंकाळी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रेड केली. रुग्णालय प्रशासनाने मेडिकल सुरू असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी दिली.
घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागाच्या इमारतीजवळून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जागेत अवैधरीत्या औषधी दुकान सुरू होते. या संदर्भात सुरक्षा विभागाकडून रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी प्राप्त झाली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत अधिष्ठाता डॉ. सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. के. डी. गर्कळ यांनी सायंकाळी या औषधी दुकानावर प्रत्यक्षा जाऊन पाहणी केली. घाटी व रुग्णालय प्रशासनाची कुठलीही परवानगी नसताना अवैधरीत्या सुरू केलेले असल्याने हे औषधी दुकान तात्काळ बंद करण्यात आले. याप्रकरणी पुढील कायदेशिर कार्यवाही रुग्णालय प्रशासनाकडून केली जाणार आहे.
या जागेवर कर्मचाऱ्यांची असलेल्या पतपेढीला पर्यायी जागा दिलेली आहे. त्यामुळे मेडिकल सुरू असलेल्या या जागेवर पतपेढीचा कोणताही संबंध राहिलेला नाही. तसेच या जागेचा उपयोग नवीन सर्जिकल इमारतीसाठी होणार आहे. त्यामुळे याठिकाणी असलेले हे बांधकाम पाडण्यात येणार आहे, असेही अधिष्ठाता यांच्याकडून नमूद करण्यात आले.