

Structural audit of Siddhartha Udyan entrance will be conducted
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग बुधवारी वादळीवाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, बांधकाम करणाऱ्या विकासक ठेकेदाराला पुन्हा नोटीस न बजावता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
तसेच खासगी एजन्सीमार्फत या प्रवेशद्वाराच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. त्यानुसार एजन्सीही नियुक्त करण्यात आली आहे. ४ दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे.
सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. असे असतानाही या प्रवेशद्वाराच्या स्लॉबवरील सिमेंट काँक्रीटच्या भिंतीचा काही भाग बुधवारी (दि.११) सायंकाळी वादळीवाऱ्याने को-सळला. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महापालिका यंत्रणाच हादरून गेली आहे. घटनेनंतर महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत व पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
उद्यानाच्या दर्शनीभागात बीओटी प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या विकासकानी बांधकामात केलेल्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा ठपका प्रशासकांनी ठेवला आहे. या प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, यासाठी अनेकवेळा महापालिका प्रशासनाने विकासकाला नोटीस बजावल्या.
परंतु या सर्व नोटीसना विकासकांनी केराची टोपलीच दाखवली. अखेर याच प्रवेशद्वारामुळे बुधवारी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे जाहीर केले. दरम्यानच्या काळात सात दिवस उद्यान बंद राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार गुरुवारी प्रशासकांनी स्ट्रक्चरल ऑडिटसाठी यश इनोव्हेशन सोल्युशन या एजन्सीला पत्र दिले. तसेच चार दिवसांत ऑडिट सादर करण्याचे आदेश दिले.
महापालिका प्रशासनाने सिद्धार्थ उद्यानातील बीओटी प्रकल्पाचे काम करणाऱ्या विकासक एजन्सीला प्रवेशद्वाराचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, यासाठी अनेकवेळा नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर या नोटीसकडे विकासकाने दुर्लक्ष केल्याचेही सांगण्यात येत आहे. तेव्हा दुर्लक्ष करणाऱ्या विकासकांवर वेळीच कुठल्याच प्रकारची कारवाई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी का केली नाही. का त्यावेळचे बीओटी प्रमुख गप्प राहिले. का शहर अभियंत्यांनी त्यांना कारवाईचे आदेश दिले नाही. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना दुर्घटनेचीच प्रतीक्षा होती का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापालिका बीओटी विभागाचे प्रमुख संजय चामले व त्यांच्या टीमने दुर्घटना झाल्यानंतर गुरुवारी उद्यानाच्या बीओटी प्रकल्पाची बारकाईने पाहणी केली. आता स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अनेक बाबी स्पष्ट होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.