Chhatrapati Sambhajinagar Political News : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
Atrocity case registered against former MP Imtiaz Jaleel
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्यावरून जलील यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.१२) अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) मराठवाडा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण सुदामराव हिवराळे (४६, रा. क्रांतीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी एका हॉटेलमध्ये इम्तियाज जलील यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी जलील म्हणाले की, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी साजापूर येथील (जातीचा उल्लेख करून) समाजासाठी राखीव असलेली जमीन ते समाजाची असल्याने लाटली, असा उल्लेख केला.
ज्या जातीवाचक शब्दांचा उल्लेख करण्यात आला, तो हिंदी भाषेत परराज्यात प्रचलित आहे. जलील यांनी या शब्दाचा सहा ते सात वेळा जाणीव-पूर्वक व संजय शिरसाट आणि समस्त जातीला अपमानित करण्यासाठी उल्लेख केल्याचे तक्रारीत नमूद आहे. सुप्रीम कोर्टाच्या २०१७ मधील एका निकालाचा दाखला देऊन हा शब्द जातीला अपमानित करणारा असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून बेगमपुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
यापूर्वीही एक गुन्हा
इम्तियाज जलील यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याबद्दल जातीवाचक उद्गार काढल्याने त्यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात एक गुन्हा नोंद आहे. त्यानंतर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने जलील यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

