

छत्रपती संभाजीनगर : ५ डिसेंबर २०२५ रोजी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर शिक्षण विभागाने सहभागी शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपातीची प्रक्रिया सुरू केल्याने शिक्षकवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे, शिवसेना अंगीकृत शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष प्राचार्य संदीप काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देत शिक्षकांच्या पगार कपातीची प्रक्रिया तात्काळ रोखण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी सादर केलेल्या अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हा परिषद शाळांतील ८६६ शिक्षक, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील ६७५ शिक्षकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला, तर अनुदानित शाळांतील ५४३ शिक्षकांनी परवानगीने रजा घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
ही संपूर्ण आकडेवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांनी शालेय शिक्षण संचालकांना अधिकृतरीत्या पाठवली आहे. मात्र आंदोलन हे शासनविरोधात नसून, शिक्षणव्यवस्थेतील अडचणी, प्रशासकीय अडथळे, वाढते अशैक्षणिक कामकाज आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण मागनि करण्यात आले होते.
तसेच अशा परिस्थितीत वेतन कपात करणे दंडात्मक ठरेल व शिक्षकांचे मनोबल खच्ची होईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे सदर वेतन कपातीची प्रक्रिया तात्काळ थांबवून प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी शिक्षक सेनेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी दीपक मोरे, भाऊसाहेब तरमळे, सचिन खलसे व नवनाथ आहेर उपस्थित होते.