

Stock of adulterated sweets worth ₹7.6 lakh, brought into the city from Ahmedabad, seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऐन सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळमाफियांना एफडीएने मोठा दणका दिला आहे. अहमदाबाद येथून शहानुरमियाँ दर्गा चौक येथे आलेल्या ट्रॅव्हल्स बसेसवर रविवारी छापे टाकत तब्बल ७.६ लाखांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त मिठाई आणि खवा जप्त केला आहे. पहिल्या कारवाईत ५ लाख ९४ हजार किमतीचा तर, याच ठिकाणी दुसऱ्या कारवाईत १ लाख ६७ हजार रुपये किमतीचा संशयास्पद मिठाई साठा जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवामुळे शहरात मिठाईची मागणी वाढली आहे. त्यामुळे भेसळमाफियादेखील सक्रिय झाले आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेंतर्गत अन्न व खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी धडक कारवाई सुरू आहे.
याअंतर्गत एफडीए पथकाने रविवारी शाहनूरमियाँ दर्गा चौक, डी- मार्टजवळ ट्रॅव्हल्स पार्किंग परिसरात अहमदाबाद येथून आलेल्या नीलकंठ ट्रॅव्हल्सच्या बस (एआर०१ एआर ५१३५) मधून २०७९ किलो ग्रॅम ३,५५,५०० रुपये किमतीचा आणि वीर ट्रॅव्हल्स (एआर०२ सी ७८७८) च्या तपासणीतून १६१२ किलो आणि २,४९,२३६ रुपये किंमतीचा मिठाई व खवा जप्त केला.
तर याच ठिकाणी संध्याकाळी नीलकंठ ट्रॅव्हल्सच्या बसवर छापा टाकून तपासणीतून १ हजार ६७ किलो आणि १ लाख ६७ हजार २० रुपये किंमतीचा भेसळयुक्त मिठाईचा साठा जप्त केला आहे. सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तीका झाडे व योगेश चिभादे यांच्या पथकाने केली.
पहिल्या कारवाईत ५,९४,७३६ साठा जप्त
नीलकंठ ट्रॅव्हल्स (एआर ०१ एआर ५१३५) या बसमधून २,०७९ किलो (किंमत ३,५५,५००) राधे बँडचे 'रिच स्विट डिलाईट' (कंडेन्स्ड मिल्क) आणि गोड हलवा जप्त केला. वीर ट्रॅव्हल्स (एआर ०२ सी ७८७८) बसच्या तपासणीतून १,६१२ किलो (किंमत ₹ २,४९,२३६) नांदेश्वर बँडचे प्रिमियम डेझर्ट व गोड हलवा, ब्रिजवासी ब्रँडचे रिच स्विट डिलाईट आणि गोकुळ ब्रँडची पारंपरिक मिठाई जप्त करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत १ लाख ६७ हजारांची मिठाई जप्त
- नीलकंठ ट्रॅव्हल्सच्या बसमधून विक्रीसाठी आणलेला आणखी १,०७४ किलो ग्रॅम संशयास्पद साठा हस्तगत करण्यात आला, ज्याची किंमत १,६७,०२० रुपये आहे. यात कृष्णा (डिलिशिअस स्विट) (इंडियन स्विट्स) श्री गोवर्धन गोल्ड (पारंपरिक स्वाद मिठाई) डिलाऊस रिलाइट (कंडेन्स्ड मिल्क अॅनालॉग) डिलिशिअस डिलाईट (स्टार्च आधारित मिठाई) श्रीराम खवा गोड हलवा) समावेश आहे.