

Sambhajinagar News : Arch in Jijau Chowk named after Jijau or Minister Shirsat?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: ज्यांच्या प्रेरणेने आणि संस्कारांतून हिंदवी स्वराज्य उभे राहिले, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नावाने जालना रस्त्यावरील जिजाऊ चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या कमानीवर चक्क त्यांच्या नावासमोर 'संकल्पना : संजय शिरसाट' असा पालकमंत्र्यांचा ठळक उल्लेख केल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 'कमान जिजाऊंच्या नावाची की मंत्री शिरसाटांच्या?' असा संतप्त सवालही शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
शेकडो शिवप्रेमींच्या लढ्यानंतर केंब्रिज चौकाला जिजाऊंचे नाव देण्यात आले. येथे भव्य कमान उभारण्याची जुनी मागणीही शिवप्रेमींची होती. त्यानुसार सरकारी निधीतून कमानीचे काम सुरू झाले. मात्र, काम अंतिम टप्प्यात असताना त्यावर जिजाऊंच्या नावासमोर पालकमंत्री शिरसाट यांच्या नावे लावण्यात आले. या प्रकारामुळे नागरिक व शिवप्रेमींमधून तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
शिवछत्रपतींनी शेकडो गड-किल्ले जिंकूनही स्वतःच्या नावाचा मोह धरला नाही; मग जनतेच्या कररूपी पैशातून उभारल्या जाणाऱ्या वास्तूंवर आजच्या लोकप्रतिनिधींना स्वतःचे नाव कोरण्याचा अट्टाहास का, असा रोखठोक सवाल शिवप्रेमी विचारत आहेत. जर श्रेय घ्यायचेच होते, तर कोनशिलेवर नामोल्लेख करता आला असता; थेट मुख्य कमानीवरच असा उल्लेख करणे हा जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा अवमान आहे.
दरम्यान हा नामोल्लेख कोणत्या शासकीय नियमानुसार करण्यात आला, याचा प्रशासनाने तातडीने खुलासा करावा आणि कमानीवरून पालकमंत्र्यांचे नाव त्वरित हटवून केवळ 'राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांचेच नाव ठळकपणे ठेवावे, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.