

ST inspection squad arrives in Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : नाशिक विभागात आर्थिक अनियमितता आणि कामकाजातील गंभीर त्रुटींप्रकरणी विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्यासह ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता राज्य परिवहन महामंडळाच्या चौकशी पथकाचे रविवारी (दि.५) छत्रपती संभाजीनगरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, परंतु नेमके कोठे तपासणी करणार याची माहिती नसल्याचे विभागीय कार्यालयांसह सर्व कार्यशाळा तसेच दोन्ही बसस्थानकांतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पथकांची वाट पाहून हवा टाईट झाली होती. विभागीय कार्यालयापासून आगारांपर्यंत अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून, पुढचा क्रमांक कुणाचा याचीच चर्चा दिवसभर रंगली होती.
महामंडळाने अचानक धडक तपासणीचे धोरण स्वीकारल्याने संभाजीनगर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पथक येणार असल्याची चर्चा होती. अखेर रविवारी पथक दाखल झाल्याने अनेक अधिकाऱ्यांची हवा टाईट झाली आहे. विविध विभागातील कागदपत्रे, महसुली नोंदी, वाहन व्यवस्थापन, रोख व्यवहार आणि उपस्थिती नोंदवहीची लगबगीने पडताळणी करण्यासाठी विभागीय
व्यवस्थापक अनघा बारटक्के यांनी रविवारी सकाळीच मुख्य बसस्थानक गाठून काही सूचना दिल्या, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक विभागात झालेल्या कारवाईनंतर संभाजीनगर विभागातही आर्थिक व्यवहार, तिकीट महसूल, वाहन देखभाल, इंधन वापर, स्क्रॅप विक्री तसेच विविध प्रशासकीय बाबींची सखोल चौकशी होणार असल्याने संबंधित अधिकारी सावध झाले आहेत.
अनेकांनी प्रलंबित फाईली निकाली काढण्याची घाई सुरू केल्याचेही दिसून आले. महामंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी पथक काही दिवस संभाजीनगर विभागात मुक्काम करून विविध आगारांची अचानक तपासणी करणार आहे. चौकशीत अनियमितता आढळल्यास नाशिकप्रमाणेच कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चर्चाना उधाण
आता नंबर कुणाचा, दिवसभर चर्चा
चौकशी पथक संभाजीनगरात दाखल
विभागीय कार्यालयात दिवसभर हालचाली वाढल्या
कागदपत्रांची घाईघाईने पूर्तता
विविध आगारांची अचानक तपासणी होण्याची शक्यता
अनियमितता आढळल्यास निलंबनासह कठोर कारवाईचे संकेत.