

सिल्लोड : चारित्र्याच्या संशयातून २८ वर्षीय पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२०) रात्री सिल्लोड शहरात घडली. यात विवाहित महिला सुमारे ४० टक्के भाजली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सभा सलमान पिंजारी (२८) असे महिलेचे नाव आहे. तर सलमान कलीम पिंजारी (३०, दोघे रा. सिल्लोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून सोमवारी मध्यरात्री दोघांमध्ये वाद झाला. पत्नीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतू तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपीने घरात ठेवलेल्या बाटलीतील पेट्रोल पत्नीच्या अंगावर टाकून पेटवून दिले.
महिलेने आरडाओरड केल्याने शेजारील नागरिक तातडीने धावले महिलेला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर पोलिसांनी जखमी अवस्थेत महिलेचा जबाब नोंदवला. यात पती नेहमीच चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे सांगितले. घटनेच्या रात्रीही त्याने मारहाण करून पेट्रोल टाकत आग लावल्याचा आरोप महिलेने केला आहे.
या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात महिलेच्या जबाबावरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे करीत आहेत.
दरम्यान तीन-चार दिवसांपूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यावरील न्यायालयाच्या गेटवर एका महिलेला पतीने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सुदैवाने नागरिक मदतीला धावल्याने महिला बचावली. त्यानंतर ही घटना शहरात घडली आहे.