

Sillod Rs 74,000 stolen from hotel counter
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : एकाने हॉटेल मॅनेजरला रूम पाहण्यासाठी नेले. तर दोघांनी काउंटरमधून ७४ हजार रुपये काढले. नंतर रुमच्या भाड्यावरून नाही म्हणत तिघे पैसे घेऊन पसार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव फाट्यावर घडली.
शहरालगत असलेल्या डोंगरगाव फाट्यावर हॉटेल लेकव्ह्यू अॅण्ड लॉजिंग आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे हॉटेलचा दरवाजा लावून मॅनेजर आण्णा शांताराम सपकाळ (३२, रा. हळदा, ता. सिल्लोड) काउंटरजवळील सोप्यावर झोपले. रात्री दीड वाजेच्या सुमारास एका कारमधून तिघे आले. त्यांनी दरवाजा वाजवल्याने मॅनेजर यांनी दरवाजा उघडला.
तिघे आतमध्ये आले व रुमची मागणी केली. एक जण मॅनेजरसोबत दुसऱ्या मजल्यावर रूम पाहण्यासाठी गेला. तर दोघे खाली काउंटरजवळील सोप्यावर बसले. मॅनेजर रूम दाखवत असताना एकाने काउंटरमधील ७४ हजार रुपये काढले व कारजवळ जाऊन थांबला. तोपर्यंत मॅनेजर रूम दाखवून खाली आले. मात्र भाड्याचे निमित्त करीत चोरटे निघून गेले.
शनिवारी सकाळी काउंटर उघडल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला. मॅनेजरने सीसीटीव्ही तपासले असता सर्व घटना फुटजेमध्ये दिसून आली. या प्रकरणी शनिवारी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविर- ोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.