

Sillod News: Three Members of the Same Family Die; Village of Dhanora Plunged into Mourning
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
बांधकाम सुरू असलेली विहीर खचल्याने माती खाली दबून मुलासह दोन तरुण मुलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी (दि. ९) रात्री अकराच्या सुमारास घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा अकाली मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.
बाजीराव सर्जेराव काकडे (४९), अजिनाथ बाजीराव काकडे (२६), शाम बाजीराव काकडे (२२) सर्व रा. धानोरा अशी मृतांची नावे आहे. बाजीराव काकडे यांची सर्वे नं. ६१/ १ मध्ये शेती आहे. तर कुटुंबासह ते शेतात वास्तव्यास होते.
शेतातील विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने तिघे बाप लेक रात्री विहिरीचे पाणी काढत होते. शनिवारी रात्रीही तिघे पाणी काढण्यासाठी विहिरीत खाली उतरले. या दरम्यान विहीर खचली व यात मातीखाली दबून वडील- लेकांचा मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याची पत्नी लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या होत्या. लग्नाहून परत येताच दहाच्या सुमारास महिलेने पतीला मोबाईल कॉल केला होता परंतु तो बंद येत होता. वाट पाहून त्यानंतर बाप - लेकही आले नाही. तर फोनही बंद येत होता. यामुळे काळजीपोटी महिलेने जाऊन पाहिले असता विहीर खचल्याचे दिसून आले. महिलेने आरडाओरडा केली व शेजारील नागरिक धावून आले. तर माहिती मिळताच अख्ख गाव घटनास्थळी मदतीला धावून आल.
रात्रीच ग्रामस्थांनी दोन पोकलेन आणून माती काढण्याचे काम हाती घेतले. या दरम्यान रविवारी सकाळपर्यंत तिघांचे मृतदेह मिळून आले. मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले व रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. रात्री जवळपास सात तास माती काढण्याचे काम सुरू होते. रात्री माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी उपनिरीक्षक लहू घोडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल यतीन कुलकर्णी, अनंत जोशी, राजू काकडे, भिक्कन सतुके, नागलोद यांच्यासह धाव घेत रात्रभर थांबून मदत कार्य केले.
नातेवाईकांचा आक्रोश
मृत वडील- लेकांवर रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह गावी आणताच कुटुंबासह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. तर एकाच वेळी वडिलासह दोन तरुण मुलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबासह नातेवाईकांवर आली. तर हे दृश्य मन हेलावणारे होते. कुटुंब व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.
पतीसह दोन तरुण मुले गमावली
शेतकरी बाजीराव काकडे यांच्या पत्नीने पतीसह दोन तरुण मुले गमावले. तर सासू- सुनेवर एकाच वेळी विधवा होण्याची दुर्दैवी वेळ आली. शनिवारची रात्र या कुटुंबासाठी काळाची ठरली. या दुर्दैवी घटनेत काकडे कुटुंबाचे क्षणात होत्याचे नव्हते झाले. अजिनाथ विवाहित तर शाम अविवाहित होता. अजिनाथ काकडे यांना अवघी एका वर्षाची मुलगी आहे. तर त्यांचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेले होते.