

Siddhartha Udyan has been closed for a month now
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महिनाभरापूर्वी सिद्धार्थ उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दुर्घटनेत दोन पर्यटक महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर चौकशी समिती नियुक्त करून मनपा प्रशासकांनी निकृष्टदर्जाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्णतः पाडण्याचे आदेश दिले होते. या घटनेच्या महिनाभरानंतरही ते जीवघेणे प्रवेशद्वारे जैसे थेच असून, उद्यानही बंदच आहे. त्यामुळे पर्यटकांसह बच्चेकंपनीचा हिरमोड होत असून, मनपाचा कारभार थंडावला असल्याचे यावरून दिसून येत आहे.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ उद्यानासाठी नवे मुख्य प्रवेशद्वार बांधले होते. मात्र दोन वर्षांतच उद्यानाचा मुख्य प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळून दोन पर्यटकांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर प्रशासनाने बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. हा चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
मात्र दोन महिलांचा जीव घेणारा प्रवेशद्वार अजूनही जैसे थे तसाच उभा आहे. तो पूर्णतः तोडण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप त्यावर बुलडोझर चालवण्यात आलेला नाही. हे प्रवेशद्वार तोडले जात नसल्याने तब्बल महिनाभरापासून उद्यानही बंद ठेवण्यात आले आहे. यावरून मनपाचा कारभार थंडावल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान या उद्यानातील प्राणिसंग्रालय पाहण्यासाठी बाहेरगावचे पर्यटक मोठ्याप्रमाणात येत असतात. मात्र उद्यानच बंद असल्याने पर्यटकांना माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या पावसाळा सुरू असून, सिद्धार्थ उद्यानात खेळण्यासाठी आणि प्राण्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र मागील महिनाभरापासून उद्यान बंद असल्याने शहरासह बाहेरगावांहून येणाऱ्या चिमुकल्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.