

7 kg tumor removed from 60-year-old woman's stomach
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पोटदुखीने बेजार असलेल्या एका ६० वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल ७.१५ किलो वजनाचा आणि २९.६द्व२३.३८१० सेमीचा मोठा गोळा काढण्यात आला. मिनी घाटीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी ही अत्यंत दुर्मिळ आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया शुक्रवारी (दि. ११) यशस्वी करत या महिलेला वेदनामुक्त केले. तब्बल दीडतास ही शस्त्रक्रिया सुरू होती.
चिकलठाणा येथील मिनी घाटीत चार दिवसांपूर्वी फुलंब्री येथील ६० वर्षीय महिला रुग्ण वेदना, पोट फुगणे आणि त्रासाच्या तक्रारी घेऊन दाखल झाल्या होत्या. सोनोग्राफी आणि नंतर सीई सिटीस्कॅनद्वारे तपासणीत या महिलेल्या पोटात डाव्या बाजूला प्रचंड आकाराचा ओव्हरियन सिस्ट (गोळा) आढळून आला.
जो इतका मोठा होता की तो पोटात दुसऱ्या बाजूला ढकलत होता. फुफ्फुसापर्यंत पसरल्याने धोका निर्माण झालेला होता. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचे नियोजन केले. त्यानुसार शुक्रवारी स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. मुजफ्फर अली यांनी शस्त्रक्रिया केली. भुलतज्ज्ञ म्हणून डॉ. संजय चव्हाण, डॉ. अर्चना वसुकर, स्वाती प्रधान यांच्यासह ओटीच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले.
या रुग्णाचे पोट चिरून मोठ्या आकाराचा ओव्हरियन सिस्टचा गोळा काढण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण पोटाच्या हिस्टेरेक्टॉमीसह लॅपरोटोमी पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी रुग्णाची गर्भाशय पिशवीही काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.