

Shri Sant Eknath Maharaj's palanquin ceremony will arrive in Paithan today
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या पवित्र पादुकांचे पालखी सोहळा आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दि. १८ रोजी सायंकाळी पैठण नगरीतून प्रस्थान झाले होते. विठ्ठल रुक्माई मंदिरातील धार्मिक कार्यक्रम पूर्ण करून पैठण येथे सोमवारी (दि. २१) सायंकाळी नाथांच्या पवित्र पादुकांचे आगमन होणार आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पैठण नगरीतील भाविक सज्ज झाली आहे.
गेल्या ४२६ वर्षांपासून वारकरी संप्रदायाच्या परंपरेत पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी मानाचे स्थान असलेल्या दहा संत पालखी सोहळ्यांपैकी श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पालखी सोहळाप्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, ज्ञानेश महाराज, योगेश महाराज पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे मार्गस्थ झाला होता. रथाच्या पुढे व मागे अशा ४० दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. ३० हजारांहून अधिक वारकऱ्यांचा सहभाग होता.
पंढरपूर येथील पारंपरिक धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर पंढरी नगरीतून पांडुरंगाचा निरोप घेऊन बाडी, निमगाव टे, साडे, देविचामाळा, हाळगाव, जामखेड, डोंगरकिन्ही, गोमळवाडे, टेंभुर्णी, येळी, शिंगोरी या दहा गावांच्या पंचक्रोशीतील मुक्काम करून सोहळ्याचे सोमवारी सायंकाळी पैठण नगरीत आगमन होणार आहे.
सोहळ्यातील वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यासाठी भाविकांसह स्थानिक प्रशासन विभागातील तहसीलदार ज्योती पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरक्षक महादेव गोमारे, नायव तहसीलदार राहुल बनसोडे, प्रभाकर घुगे, कैलास बहुरे, नाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहायक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया, बलराम लोळगे व शहरातील भाविक सज्ज झाले.
नाथांच्या पादुकांची भव्य मिरवणूक पालखी रस्त्याच्या पारंपरिक मागनि पाटेगाव, कुंभारवाडा, भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, खंडोबा चौकातून काढण्यात येणार आहे. नाथांच्या समाधी मंदिरात भाविक भक्तांच्या उपस्थितीत वारकरी भजन सादर करून पादुका गावातील नाथ मंदिरातील देवघरात विराजमान करण्यात येणार आहे.