

E-KYC of four and a half lakh beneficiaries in the district is pending.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात सहा महिन्यांपासून रेशन कार्डधारकांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु अजूनही जिल्ह्यातील २० टक्के म्हणजे ४ लाख ७१ हजार ६३० लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. तांत्रिक अडचणी येत असल्याने लाभार्थी आणि दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यात २३ लाख ९९ हजार रेशन कार्ड सदस्य आहेत. या सदस्यांच्या पडताळणीसाठी राज्य शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. यापैकी १२ लाख ३१ हजार सदस्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तर ६ लाख ८३ हजार ९७ जणांची ई-केवायसी निरीक्षकांच्या लॉगिंगला पेंडिग आहे. १३ हजार ४२१ जणांची ई-केवायसी रिजेक्ट करण्यात आली आहे. अशा प्रमाणे १९ लाख २७ हजार ८६० सदस्यांच्या ई-केवायसीबाबत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप ४ लाख ७१ हजार ६३० जणांची ई-केवायसी बाकी आहे.
ई-केवायसी प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे अन्नधान्य वितरण विभाग छत्रपती संभाजीनगर, पैठण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि वैजापूर तालुक्यांमध्ये आढळून आली आहेत. पैठण तालुक्यात तब्बल २७ टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.
त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (२२ टक्के), वैजापूर (२२ टक्के) आणि अन्नधान्य वितारण अधिकारी कार्यालय (१८ टक्के) ई-केवायसीचे काम बाकी आहे. दुसरीकडे वारंवार सर्व्हर डाऊन असल्याने लाभार्थी आणि दुकानदार वैतागले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून केवायसी प्रक्रिया करताना सव्र्व्हर डाऊनचा संदेश सातत्याने येत असल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.