Shri Sant Eknath Maharaj Palkhi : सोहळा पंढरपूरनगरीत आज दाखल होणार
Shri Sant Eknath Maharaj Palkhi reach Pandharpur
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि.४) सायंकाळी (होळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या गावाच्या भीमा नदीच्या तीरावर शेवटचा मुक्कामासाठी आगमन झाले. पालखी सोहळा शनिवारी संध्याकाळी पंढरपूर येथे दाखल होणार आहे.
होळे परिसरातील सरपंच युवराज भुसनर, सचिन भुसनर, बाळासाहेब भुसनर, बबन नायकुडे, अर्जुन नरले यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांच्या पादुकांचे पूजन करून वारकऱ्यांचे भव्य स्वागत मिरवणूक काढून केले आहे. यावेळी होळे शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगांच्या तालावर भानुदास एकनाथांचा जयघोष करून पावल्या फुगड्या लेझीम खेळून आनंद घेतला.
नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. पालखीने १८ जून रोजी पैठणनगरीतून प्रस्थान झाले होते. यादरम्यान सोहळ्यातील वारकऱ्यांनी चनकवाडी, हदगाव, कुंडलपारगाव, मुंगूसवाडा, राक्षसभवन (तांबे), रायमोह, पाटोदा, दिघोळ, खर्डा, दांडेगाव, अनाळे, परांडा, बिटरगाव, कुई, अरण, करकंब येथे मुक्काम केला.
आज भीमास्नान सोहळा
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.५) सकाळी भानुदास एकनाथ जयघोषात नाथांच्या पवित्र पादुकांचे भीमा नदीच्या तीरावर शेकडो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत भीमास्नान सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची सर्व तयारी होळे येथील भाविक ग्रामस्थांनी केली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर भाविक होळे परिसरातील भीमा नदीच्या पुलावर दर्शनासाठी गर्दी करतात.

