

Shri Sant Eknath Maharaj Palkhi-Paduka procession arrives in Paithan
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यात मानाचे स्थान असलेला श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. ९) पैठण येथे दाखल झाला. पंढरीनगरीतील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी ७ जुलै रोजी पैठणनगरीतून प्रस्थान झालेला होता.
नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, ज्ञानेश महाराज गोसावी, अॅड. योगेश महाराज गोसावी, रवींद्र महाराज पांडव, सचिन महाराज पांडव, रवी महाराज कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी, प्रसाद सेवनकर देवा यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस दिंड्यांनी सहभाग घेतला. पैठण पंचक्रोशीसह मराठवाड्यातील विविध ठिकाणावरून हजारो महाराज मंडळी व वारकऱ्यांचा यात सहभाग होता.
पंढरीला जाताना १७ मुक्काम पूर्ण करून आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला सोहळा पंढरीत दाखल झाला होता. पंढरपूर येथील नाथांच्या मंदिरात सोहळ्याच्या प्रथेप्रमाणे धार्मिक कार्यक्रमासह विधी पूर्ण करून २९ जुलै रोजी पांडुरंगा समोर नतमस्तक होऊन परतीचे प्रवासासाठी सोहळा मार्गस्थ झाला होता. परतीचा पहिला मुक्काम बार्डी पंचक्रोशीत पूर्ण केला होता. निमगाव टे, साडे, देवाचामळा, हाळगाव, जामखेड, डोंगरकिन्ही, गोमळवाडे, टेंभुर्णी, येळी, शिंगोरी, घारी आदी.
परतीच्या पालखी मार्गावरील ११ पंचक्रोशी मुक्काम झाला होता. रविवारी सायंकाळी हजारो वारकऱ्यांसह पादुका पालखी सोहळा पैठणनगरीत मोठ्या उत्साहात दाखल झाला. यावेळी दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पंढरीहून आलेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या.
याप्रसंगी भाविकांच्या वतीने नार्थाच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी नाथांच्या पादुकांचे पूजन करून नाथ मंदिर समितीचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन लोहिया, बलराम लोळगे, पाटेगावचे सरपंच गोकुळ रावस, उपसरपंच सतीश करपे, व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले, रामेश्वर सुसे, उमेश टट्ट श्रीराम आहुजा, दिनेश पारिक, प्रसाद खिस्ती, विष्णू ढवळे, नानक वेदी यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. उपस्थित सर्व भाविकांना नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला.
नाथांच्या पादुकांचे, चांदीच्या रथाची भव्य मिरवणूक: पंढरीहून दर्शन करून आलेल्या वारकऱ्यांसह नाथांच्या पादुकांचे, चांदीच्या रथाची मिरवणूक टाळ-मृदंगांच्या तालावर काढण्यात आली. मानुदास एकनाथांच्या जयघोषात हरिनामाचा गजर करून मिस्वणूक नाथांच्या समाधी मंदिरात दाखल झाली. यावेळी समाधी मंदिरात पंढरीहून आलेले वारकरी व पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने भजन आरती संपन्न झाली. नाथांच्या पादुका गावातील नाथांच्या वाड्यातील देवघरात पूजन करून विराजमान करण्यात आल्या.