

Electricity theft in Nyayanagar with the connivance of employees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गारखेडा परिसरातील न्यायनगर येथील गल्ली क्रमांक ८ सह परिसरात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक घरांमध्ये वीज मीटर नसतानाही वीज पुरवठा सुरू असून, महावितरण कर्मचाऱ्यांच्या संगणमतानेच वीज चोरी सुरू असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला.
न्यायनगर परिसरातील काही घरांमध्ये अधिकृत वीज मीटर नसतानाही वीज पुरवठा सुरू आहे. काही ग्राहकांकडे मीटर आहे, परंतु त्याचे बिलच येत नसल्याच्याही तक्रारी येथील नागरिकांनी केल्या. हातावर पोट भरणारे नियमित बिल भरत आहेत. तर काही जण महावितरण कर्मचाऱ्याला हाताशी धरून वीज चोरी करत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधला असता असे प्रकार तर होणार नाहीत, तरीही त्या परिसरातील प्रमुखांशी संपर्क साधून पुढील माहिती देतो असे सांगितले. दरम्यान, या परिसरात अचानक तपासणी केल्यास मोठ्या MAY/ प्रमाणावर वीजचोरी उघडकीस येणार आहे. मीटर नसलेले तसेच वीजवाहिनीवरून घेतलेल्या अनधिकृत जोडण्याही समोर येण्याची शक्यता आहे. याची योग्य तपासणी करून कर्मचाऱ्यांच्या सहभागाची चौकशी करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.