

Shri Sant Eknath Maharaj Palkhi Ceremony
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : श्रीसंत एकनाथ महाराज, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह विविध संतांच्या पालखीचा मुक्काम विसावासाठी करकंब नगरीत (ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर) दाखल झाला होता. वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात पुण्यभूमी दुमदुमली.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी श्रीसंत सावता महाराज यांची संतभेट घेऊन सोहळा सायंकाळी मोठ्या उत्साहात करकंब या पंचक्रोशीत मुक्कामासाठी दाखल झाला. यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी नाथांच्या पादुकांची वाजत गाजत मिरवणूक काढून पूजन करून दर्शन घेतले.
यावेळी महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक त्रिंबकेश्वर, बीड, जालना, शेगाव, धाराशिव या जिल्ह्यांतून पंढरीच्या आषाढी वारीसाठी मार्गस्थ झालेल्या विविध संत महंत यांच्या पायी दिंडींचे येथे आगमन झाल्याने भाविकांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत केले.
सोहळ्याचा मुक्काम या पंचक्रोशीत असल्याने प्रत्येक गल्लीत, घराघरांत भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड वारकऱ्यांकडून हरी नामाचा गजर सुरू आहे. सोलापूर प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महसूल, आरोग्य, पोलिस, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे विशेष पथक स्थापना करण्यात आले होते. दरम्यान, सोहळ्याचा सतरावा मुक्काम भीमा नदीच्या काठावर होळे (ता. पंढरपूर) येथील पंचक्रोशीत होणार आहे.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रथमच चांदीचा रथ तयार करण्यात आल्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी नाथांच्या पादुका पालखी रथाची भव्य मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी करून भानुदास एकनाथ जयघोष केला.