

Shri Kashi Vishweshwar Mahadev Temple of Old Jyotinagar in the field
भाग्यश्री जगताप
छत्रपती संभाजीनगर : बम बम भोले.... जय महेश, ओम नमः शिवाय चा गजराने संपूर्ण ज्योतिनगर परिसर भक्तिमय वातावरणात जणू न्हाहून निघतो. शांत आणि प्रसन्न अशा वातावरणात भाविक प्रतिदिन दर्शन घेतात. ते मंदिर म्हणजे श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर, जे गेले १५ ते २० वर्षांपासून ज्योतीनगरमध्ये उभारले गेले असून, भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक बांधिलकीही मंदिरात जपली जाते, अशी माहिती गिरज-ाराम हळनोर यांनी दिली.
तसे पाहिले तर ज्योतिनगर परिसरात तीन महादेव मंदिरे आहेत. त्यातील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे. ज्या मंदिरात विविध कार्यक्रमही घेण्यात येतात. ज्योतीनगर परिसरात पूर्वी शेत होते. शेतातील हे जुने मंदिर आहे. त्या मंदिराला हळूहळू सर्व ज्योतीनगर भागातील नागरिकांनी सहकार्य केल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन मंदिर सर्व भाविकांसाठी खुले झाले आहे. अंडर ग्राऊंड हे मंदिर आहे. वरती विठ्ठलाचे मंदिर आहे. तसेच याच भागात मारुती, साईबाबा, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, श्रीदत्त, कार्तिक स्वामी यांचेही मंदिर आहे.
धार्मिकतेबरोबर सामाजिक बांधिलकीही जपली...
महेशनवमी असो की महाशिवरात्रीला धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. महेशनवमीला भजन, कीर्तन तसेच महाशिवरात्रीला लघु रुद्राभिषेक केला जातो. फराळ वाटप केले जाते. तसेच प्रतिदिन मंदिरात भाविक पूजा करतात. ओम नमः शिवायचा गजर करतात. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाहून जातो. तसेच भजन, कीर्तनही मंदिरात पार पडते.
असे पडले मंदिराला श्री काशी विश्वेश्वर नाव
काशी या ठिकाणी ज्या पध्दतीने शिवलिंग आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी शिवलिंग आहे. अंडर ग्राऊंड म्हणजे भूमिगत हे मंदिर आहे. काशी येथील गंगेतून पाणी, माती आणून या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे श्री काशी विश्वेश्वर हे नाव पडले. मंदिराचे वातावरण अत्यंत शांत असल्याने या ठिकाणी अनेक भाविक ध्यान धारणा करतात.
विविध कार्यक्रम होतात
श्रावण महिन्यात सर्वाधिक भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. तसेच श्रावण महिन्यात लिंगार्चन, रोज अभिषेक केला जातो. तसेच महाशिवरात्रीला विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. याशिवाय विविध ठिकाणाहून अनेक भक्त दर्शनासाठी येतात. प्रत्येक सोमवारीही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते.