

Shri Gajanan Maharaj's palanquin welcomed with joy in Shahapur village
शहापूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रे निम्मित श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री क्षेत्र शेगाव येथे परतीच्या प्रवसाकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी (दि.१९) रोजी अंबड तालुक्यातील शहापूर येथे सायंकाळी ५ वाजता आगमन झाले. यावेळी शहापूर येथील नागरिकांनी ढोल ताशांचा गजर व फटाक्याची आतिषबाजी करून पालखीचे जंगी स्वागत केले.
या वेळी पालखीच्या मार्गावर स्वागतासाठी पालखीच्या गावकऱ्यांच्या वतीने शहापूर पासून १ किलोमीटरपर्यंत लांब रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. शहापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने श्री च्या पालखीचे भक्तीमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले.
या पालखीत ७०० वारकरी सहभागी झाले आहेत. श्री कृष्ण वसाहत शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता पालखीचे आगमन झाले. पालखी आगमनापासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. शहापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील प्रसादाची व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आली.
पालखीतील वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोंदी पोलिसांकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात २० पोलिस अधिकाऱ्यांसह १५० पोलिस कर्मचारी व वाहतूक पोलिस देखील तैनात करण्यात आले होते.