Grishneshwar Shravan Special Darshan | श्रावणात घृष्णेश्वर दर्शन होणार सुकर; गर्दी आणि वाहतुकीसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

१३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष नियमावली लागू
Grishneshwar Darshan Crowd Management
Grishneshwar Darshan Crowd ManagementPudhari
Published on
Updated on

Grishneshwar Darshan Crowd Management

वेरुळ : श्रावण महिन्यात देशभरातून श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने दर्शन व्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षेसाठी विशेष नियोजन केले आहे. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, तसेच गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी व अनुचित प्रकार टाळता यावेत, यासाठी १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे.

व्हीआयपींसाठीही नियमांचे बंधन

श्रावणातील गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल स्वीकारला जाणार नाही. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दुपारी २ ते ४ या वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड आणि शिफारसपत्र तपासल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.

Grishneshwar Darshan Crowd Management
Shravan fasting during pregnancy: गर्भवतींसाठी श्रावण उपवासाचे 'हे' सुवर्णनियम माहिती आहेत का?

नातेवाईकांना सामान्य दर्शन रांग

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र व्हीआयपी प्रवेशाची सुविधा असणार नाही. त्यांनाही सर्वसामान्य भाविकांप्रमाणे दर्शन रांगेतूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. गर्दीच्या काळात सर्व भाविकांसाठी समान दर्शन व्यवस्था राखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

चार टप्प्यांत ‘नो व्हेईकल झोन’

श्रावणातील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेरुळमधील वाहतुकीवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भगवान महावीर चौक ते मालोजीराजे भोसले चौक या मार्गावर १४ ते १८ ऑगस्ट, २१ ते २५ ऑगस्ट, २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर आणि ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ‘नो व्हेईकल झोन’ राहणार आहे. या कालावधीत या मार्गावर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

भाविकांसाठी विशेष जनसंपर्क कक्ष

दर्शन, वाहतूक, पार्किंग आणि अन्य आवश्यक बाबींबाबत भाविकांना तातडीने माहिती व मार्गदर्शन मिळावे, यासाठी महसूल विभाग, पोलिस विभाग आणि देवस्थान विश्वस्त मंडळाच्या समन्वयातून विशेष जनसंपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध होणार आहे.

Grishneshwar Darshan Crowd Management
Shravan month myths: श्रावणात हे खाल्लं तर पाप लागतं? 'या' 7 लोकप्रिय समजुतींच्या मागील सत्य काय?

स्थानिकांना पहाटे ४ ते ८ पर्यंत प्रवेश

वेरुळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्थानिक नागरिकांना आधारकार्ड दाखवून पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. या वेळेनंतर स्थानिक नागरिकांनाही सर्वसामान्य भाविकांप्रमाणे दर्शन रांगेतूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

सुरक्षेवर विशेष भर

श्रावण महिन्यात मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिस, महसूल विभाग आणि मंदिर प्रशासनाकडून सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली जात आहे. गर्दीचे नियोजन, वाहनांची वाहतूक, पार्किंग व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

Grishneshwar Darshan Crowd Management
Benefits of Avoiding Alcohol in Shravan-श्रावणात महिनाभर मद्य वर्ज्य केल्याने शरीरात काय बदल होतात?

प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

श्रावण महिन्यात घृष्णेश्वर मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने भाविकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. दर्शन व्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षेसाठी तैनात पोलिस, महसूल विभाग तसेच मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news