

Show cause notice issued to Ward Officer of Zone 5
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : किराडपुरा येथील राम मंदिर आणि बालाजी मठाच्या ४१ एकर जमिनीवर तब्बल ८१० भूखंडांची निर्मिती करून त्यांची विक्री असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता झोन क्रमांक ५ च्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. या जमिनीवर दोन वर्षांपासून प्लॉटिंगची कामे सुरू असताना महापालिकेने वेळीच हस्तक्षेप का केला नाही, याचा खुलासा मागण्यासाठी वॉर्ड अधिकारी प्राजक्ता वंजारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती गुरूवारी (दि. १) आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, या अनधिकृत प्लॉटिंगप्रकरणात शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. त्यामुळे कारवाई लांबत असल्याचीही चर्चा सुरू असून या गटाचा सातबारा महसूल विभागाने लॉक केला असेल त्यामुळे मनपाकडून ही कारवाई करण्यात आली, अशी चर्चा जोर धरत आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जाधववाडी येथील सनी सेंटर मागे राम मंदिर आणि बालाजी मठाच्या मालकीची ४१ एकर वर्ग-२ प्रकारातील जमीन आहे. या जमिनीवर ८१० भूखंड पाडण्यात आले.
ही प्लॉटिंग श्री रामानंद बिल्डर अॅन्ड लॅन्ड डेव्हलपरच्या माध्यमातून मुकुंद गंगाधरराव कुलकर्णी यांनी केल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, प्लॉटिंगसाठीची तयारी दीर्घकाळापासून सुरू होती. गेल्या दोन वर्षांत जमिनीभोवती कम्पाऊंड उभारण्यात आले. त्यानंतर सिमेंटचे अंतर्गत रस्ते तयार झाले.
यासह ड्रेनेज लाइन टाकण्यात आली आणि पथदिवेही उभारण्यात आले. ही सर्व कामे सुरू असतानाही झोन क्रमांक ५ कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावली नाही. तसेच प्लॉटिंग थांबविण्यासाठीही कारवाई झाली नाही. त्यामुळे अखेर वॉर्ड अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देऊन या दुर्लक्षाचा जाब विचारण्यात आला आहे. यात संबंधितांचे उत्तर समाधानकारक न आढळल्यास पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
दरम्यान, प्लॉटिंगवरील विकासकामे हटविल्यानंतर आता पुढील कारवाई टाळण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये आणि महापालिकेची कारवाई पुढे जाऊ नये, यासाठी काही मंडळी गुरुवारी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडे गेल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रशासन या प्रकरणात पुढे काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
झोन-५ गप्प का?
४१ एकर जमिनीवर दोन वर्षांत प्लॉटिंगची कामे टप्प्याटप्प्याने पुढे गेली. कम्पाऊंडपासून सिमेंट रस्ते, ड्रेनेज आणि पथदिव्यांपर्यंतची कामे झाली. मात्र, झोन-५ कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावली नाही. आता या दुर्लक्षाचा खुलासा वॉर्ड अधिकाऱ्याकडून मागविण्यात आला आहे.
कारवाईनंतर आता गुन्ह्याची प्रतीक्षा
प्लॉटिंगवरील अंतर्गत सिमेंट रस्ते महापालिकेने उखडले, तर ड्रेनेज लाइनचीही तोडफोड केली. कोट्यवधींची कामे हटविल्यानंतरही प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही. जमिनीच्या विक्रीसंदर्भातील पुरावे बुधवारी मिळाले असतानाही गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.