

Shortage of EVMs in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील पाच महापालिका, आठ जिल्हा परिषदा आणि सुमारे पन्नास नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मात्र या निवडणुका घेण्यासाठी जिल्हास्तरावर पुरेशा ईव्हीएम मशीन (मतदान यंत्र) उपलब्ध नाहीत. त्यामुळे या ईव्हीएम मशीन राज्याबाहेरून मागवाव्या लागणार आहेत.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी (दि.१४) सर्व जिल्हाधिकारी, जि. प. सीईओंची ऑनलाईन बैठक घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. कोरोना काळापासून राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सर्व ठिकाणी प्रशासकराज सुरू आहे.
मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
विभागीय आयुक्त पापळकर यांनी सांगितले, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे ३० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात येत आहेत. त्याआधी निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. विभागाची मतदारसंघ, आरओ, एआरओ, गोदाम, ईव्हीएमची सद्यस्थितीची माहिती जाणून घेण्यात आली. आता आठशे ते नऊशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र.