

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
गेल्या चार वर्षांपासून मनपाकडून शहरातील पार्किंगचे धोरण ठरवण्यात येत आहे. अद्यापही त्याला मुहूर्त लागलेला नसून, आता पार्किंगसाठी नव्याने अॅप तयार करण्याचा प्रयोग केला जात आहे. त्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली जाणार असून, या एजन्सीच्या पथकामध्ये ७५ टक्के महिलांना नियुक्ती देणे बंधनकारक राहणार असल्याचा निर्णय सोमवारी (दि.१४) आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी जाहीर केला आहे.
महापालिकेकडून शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून धोरण आखले जात आहे. मात्र त्यात मनपाला फारसे यश आलेले नाही. यात शहरातील मुख्य बाजारपेठेत पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यावर जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
मात्र यावर अद्याप कुठलाही ठोस पर्याय काढण्यात आलेला नाही. याकडे लक्ष न देता आता पार्किंगसाठी स्मार्ट सिटी व महापालिकेमार्फत स्मार्ट पार्किंग अॅप्लिकेशन सुरू करण्याचा नव्याने प्रयोग केला जाणार आहे. यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ज्या रस्त्यावर पार्किंगचे धोरण राबविणे शक्य आहे, त्या रस्त्यांचा शोध जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून घ्यावा. प्रत्येक रस्त्यावर मार्किंग देणे, सीसीटीव्ह लावणे अशी जबाबदारीही या संबंधित एजन्सीची असेल, असे जी. श्रीकांत यांन नमूद केले.
तसेच पार्किंगला शिस्त लावण्यासाठ व बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यासाठीच्या पथकात २५ टक्के पुरुष तर ७५ टक्के महिलांचा समावेश करणे बंधनकारक असेल, त्यात तृतीयपंथीयांनाह संधी देण्याची अट असेल, असेही जी श्रीकांत यांनी नमूद केले आहे.