

Shivaji Nagar subway line open for traffic
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर भुयारी मार्गामध्ये पावसाचे पाणी साचून वारंवार होणारा वाहतूक ठप्पचा प्रकार टाळण्यासाठी या मार्गवर पत्र्याचे शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी सहा दिवस हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र सहा दिवसांनंतरही पत्र्याच्या शेडसाठी केवळ लोखंडी अँगलचा सांगाडा उभारून काम अर्धवट ठेवत हा मार्ग शुक्रवारी (दि.१) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या अर्धवट कामामुळे वाहनधारकांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. याविर ोधात नागरिक संतप्त झाले असून, प्रशासनावर याचे खापर फोडत आहेत.
पावसाचे पाणी साचल्यामुळे शिवाजीनगर भुयारी मार्गात वारंवार वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत होते. हा प्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यालयाने भुयारी मार्गावर पत्र्याचे शेड उभारण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी हा भुयारी मार्ग वाहतुकसाठी सहा दिवस बंद ठेवण्यात आला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पाच दिवसांत पत्र्याचे शेड उभारण्यासाठीचे केवळ लोखंडी अँगलचे काम केले. पत्रे न बसवताच अर्धवट काम करून या मार्गातून शुक्रवारपासून वाहतूक सुरू केली.
त्यामुळे या मार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पुन्हा अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या भुयारी मार्गाचे काम अर्धवट असूनही श्रेय लाटण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांनी या मार्गाचे उद्घाटन केले. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या तीन महिन्यांतच अवकाळी पावसाने भुयारी मार्गाच्या कामाचे पितळ उघडे पाडले, या मार्गात पाणी तुंबल्याने दोन दिवस वाहतूक बंद ठेवावी लागली. त्यानंतर रेल्वे विभाग, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मजीप्राच्या अधिकार्यांनी एकत्रित पाहणी केली. त्यानंतर त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र या भुयारी मार्गाकडे कुणीही लक्ष दिले नाही.
शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम अर्धवट ठेवत हा मार्ग वाहातुकीसाठी सुरू करण्यात आला. मार्ग सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांची होणारी गैरसोय टळली. मात्र लोखंडी अँगलची कडा कोसळून पडण्याची भीती व्यक्त केली जात असून, भुयारी मार्गातून जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.