

Severe delay in getting Kunbi caste certificate
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा: हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास तालुका समिती व ग्रामसमितीकडून दिरंगाई होत आहे. यामुळे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत असून, महसूल प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ सप्टेंबरला मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान काढलेल्या जीआर नुसार मराठा कुणबी समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तसेच हैदराबाद गॅझेट नुसार ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यासाठी तालुका व ग्रामसमिती नेमण्यात आलेली आहे. परंतु हे प्रमाणपत्र काढण्यासाठी तालुका व ग्रामसमितीकडून अनेक अडचणी केल्या जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलेला आहे.
शासन निर्णयानुसार सापडलेल्या नोंदीच्या आधारे तालुक्यात अनेक प्रमाणपत्र काढण्यात आलेली आहे. तसेच तालुक्यात अनेक नोंदी सापडलेल्या आहे. लाभार्थी परिपूर्ण प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल करीत आहे. मात्र वेळेत जात प्रमाणपत्र दिले जात नसून टाळाटाळ केली जात आहे.
वेळेत जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे, अशोक मोरे, अंकुश गोराडे, सोमीनाथ कळम, बबन मोरे, विलास मोरे, गणेश कळम, राजेंद्र शिंदे, कृष्णा मोरे आदींच्या सह्या आहेत.