

Service Road only after the widening of the 5 main roads in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेने पाच प्रमुख रस्त्यांवर रुंदीकरणाआड येणारी ६ हजार बेकायदा आणि अतिक्रमणे जमीनदोस्त केली. त्यानंतर पेडोको संस्थेकडून या रस्त्यांसाठी सूक्ष्म मास्टर प्लॅन तयार करून घेतला. त्यानुसार आता पीडब्ल्यूडी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना त्यांच्या अखत्यारीत रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागणार आहे. त्यानंतरच महापालिका सर्व्हिस रोडचे काम करेल, असे संकेत सोमवारी (दि.८) महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. त्यामुळे प्रशासन निधीअभावी हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिकेच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, महापालिकेच्या कामांना एक सिस्टीम लावून आवश्यक होते. त्यानुसार प्रत्येक विभागाला सिस्टीम लावून दिली असून, त्यामुळे कामामध्ये पारदर्शकता येत आहे. तसेच प्रत्येक काम हे जलद गतीने पूर्ण होत आहे. यावेळी शहरात झालेल्या पाडापाडीनंतर रस्ता रुंदीकरणाचे काम केव्हा सुरू होईल, अशी विचारणा प्रशासकांना केली. तेव्हा ते म्हणाले की, शहर विकास आराखड्यानुसार मंजूर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने मोहीम राबविली.
शहरातील एकही रस्ता हा नियोजन करून तयार केला नाही. त्यामुळे आज प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळेच पेडोको या संस्थेकडून सविस्तर विकास आराखडा तयार करून घेण्यात आला आहे. यात पडेगाव-मिटमिटा रोड, पैठण रोड, जळगाव रोड, जालना रोड आणि बीड बायपास रोडचा समावेश आहे.
दरम्यान, ही कामे मनपा निधीतून होतील का? असा प्रश्न उपस्थित होताच प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागासह जागतिक बँक प्रकल्प, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे आता हे विभाग जेव्हा महापालिकेने तयार केलेल्या मास्टर प्लॅननुसार रस्त्याचे रुंदीकरण करतील. त्यानंतरच महापालिका सर्व्हिस रोडचे काम करेल, असे प्रशासक श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
रस्त्याच्या कामातील चुका थांबणार
शहरातील एकाही रस्त्यावर खांब कुठे असावे, पूल कुठे असावा, बस थांबे कुठे असावेत, रस्त्यांची लांबी-रुंदी, फूट ओव्हरब्रीज, फूटपाथ, साईडड्रेन, ग्रीन स्पेस हे रोड फर्निचर नियोजनबद्ध पद्धतीने दिसत नाही. एवढेच नव्हे तर चौकातील रस्तेही एकमेकांशी समोरासमोर नाहीत. परंतु, पेडोकोच्या प्लॅनमध्ये सर्वच गोष्टींचा विचार केला आहे.