

Speeding car catches fire after hitting divider
करमाड, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथून पुणेकडे निघालेली भरधाव कार समृद्धी महामार्गावरून करमाडकडे येत असताना बनगाव लाहुकी फाट्यावरील चौकात चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने कार चौकातील दुभाजकाला जोरात धडकल्याने भीषण पेट घेतला. सुदैवाने कार मधील पाच जण सुखरूप बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. ही घटना सोमवार दि.८ रोजी दुपारी तीन वाजता घडली.
अनिकेत दत्तात्रय झिरपे (३४), दत्तात्रय गणपत झिरपे (६१), केतकी दत्तात्रय झिरपे (५३, रा. वडगाव शोरीती ता.जि. पुणे), कोमल अशोक गायकवाड (२९), कल्पना अशोक गायकवाड (५०, रा. डोबावली ता. कल्याण) असे या कार अपघातात किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नागपूर येथून समृद्धी महामागीवरून पुणे येथे कुटुंबाला घेऊन निघालेली कार (एम एच १३ डी वाय ९६९१) गुगल मॅपने जयपूर शिवारात येताच करमाड डीएमआयसीमध्ये उतरण्यासाठी मार्ग दाखवला त्यानुसार हे कुटुंब डीएमआयसी समृद्धी कनेक्टिव्हिटी महामार्गाद्वारे करमाड दिशेकडे येत अस-लेली भरधाव कार बनगाव लाहुकी फाट्याजवळ गतिरोधकचा चालकाला अंदाज न आल्याने गतिरोधकावरू कार आदळल्याने कारने पेट घेतला.
गतिरोधकामुळे तीसरा अपघात
लाहुकी फाट्यावरील गतिरोधकाचा अनेक चालकांना अंदाज येत नाही. अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत. या घटनेनंतर संबंधित विभागाने या ठिकाणी अपघात नियंत्रणात कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणे गरज असल्याची बाब समोर येत आहे. सदर घटनेची करमाड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.