

Send back the officers whose service in the municipality has ended
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील काही पदांवर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर २ ते ३ वर्षासाठी अधिकारी नियुक्त केले जातात. यात काहींच्या सेवाकाळ संपाल्यावर तर काहींच्या त्याअगोदरच बदल्या होता. मात्र, महापालिकेत मागील तीन ते पाच वर्षांपासून ४ अधिकारी कार्यरत असून सेवाकाळ संपलेल्या या अधिकऱ्यांना शासनाकडे परत पाठवा, अशी मागणी भाजपचे विद्यमान नगरसेवक तथा मजी सभापती राजू वैद्य यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत आयुक्तांना देण्यात आलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, शासनाच्या नियमानुसार प्रतिनियुक्त्ती सेवाकाळ कालावधी ३ ते ४ वर्षे इतका आहे. यासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत काढण्यात आलेले अध्यादेश क्रमांक एस. आर. व्ही. २०११/प्र.क्र. ९३७/कार्यासन १२ दि. १७/१२/२०१६ हा आहे. या शासन निर्णयानुसार प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी शासनाकडे परत पाठविणे हे नियमानुसार योग्य आहे. महापालिकेत काही अधिकारी २०२१ तर काही २०२२ सालापासून कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानुसार या चारही अधिकाऱ्यांचा प्रतिनियुक्तीचा सेवाकाळ पूर्ण झाला आहे.
यासोबतच प्रशिक्षणार्थी सहायक आयुक्त प्राजक्ता वंजारी या ऑगस्ट २०२४ आणि अर्चना राजपूत या ऑगस्ट २०२४ साली महापालिकेत प्रोबेशनवर आले आहेत. परीविक्षाधीन कालावधी हा एक वर्षासाठी असतो. परंतु, असे असतांनाही त्या दोन वर्षांपासून महापालिकेतच कार्यरत असून त्यांच्याकडे महत्त्वाचे पदभार दिले आहेत. त्यामुळे सेवाकाळ संपलेल्या सर्व प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविण्यात यावे, अशी मागणी माजी सभापती राजू वैद्य यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
या अधिकाऱ्यांचा समावेश
महापालिकेत २०२२ साली नगररचना विभागात सहायक संचालक मनोज गर्जे यांची प्रतिनियुक्त्तीवर बदली झाली होती. आज त्यांना चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासोबतच मुख्य लेखाधिकारीपदी संतोष वाहुळे यांची ६ सप्टेंबर २०२१ साली, उपायुक्त अंकुश पांढरे यांची सप्टेंबर २०२३ तर अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांची २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रतिनियुक्तीवर महापालिकेत बदली झाली होती.