

अंबादास दानवे यांनी तीन व्हिडिओ जाहीर केले ज्यात आमदार महेंद्र दळवी आणि नोटांची रास दिसते.
दानवे म्हणाले की व्हिडिओ घरातला वाटतो आणि योग्य चौकशीने सत्य समोर येईल.
दळवी यांनी आरोप केला की हा व्हिडिओ सुनील तटकरेंनी दानवेंना दिला.
दानवेंनी मात्र तटकरे यांच्याशी कोणताही संवाद नसल्याचे स्पष्ट सांगत आरोप फेटाळले.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि माजी विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कॅश बॉम्ब टाकला. तीन सोशल मीडियावर तीन व्हिडिओ पोस्ट केले असून त्यात आमदार महेंद्र दळवी आणि नोटांची बंडले दिसत आहेत. तर लाल टी शर्ट घातलेली व्यक्ती ओळखू येत नाही.
दानवे यांनी दुपारी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले, माझ्याकडे या लोकांशी सबंधित व्यक्तीने हा व्हिडिओ पाठवला. तुम्ही नाव घेतले त्यासारखी ही व्यक्ती दिसत आहे. समोर असणारा व्यक्तीही कोण हे तपासाले पाहिजे. तिथे नोटांची रास दिसतेय. बँकेत ५० हजार भरले तरी तिथे नोटीस येते.
मात्र, इथे तर नोटांची पूर्ण रास दिसतेय. आताच्या घडीला मी हा व्हिडिओ समोर आणलाय. योग्य चौकशी झाल्यावर सगळं समोर येईल. संजय शिरसाट यांचाही असाही एक व्हिडिओ समोर आला होता. घरातला व्हिडिओ बाहेरची लोक काढू शकतात का ? हा व्हिडिओही घरातला वाटतोय. त्या आमदारांना या नोटा कसल्या आहेत सगळं माहिती आहे असे दानवे यांनी स्फोट केला.
दरम्यान, सुनील तटकरे यांनीच दानवे यांना हा व्हिडीओ पुरवल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी दानवे यांना केला. त्यावर दानवे म्हणाले, तटकरे आणि माझा जवळपास काहीच संवाद नाही. आधी जेव्हा एकत्र होतो तेव्हा बोलणे व्हायचे. महेंद्र दळवी आहे तसेच समोर लाल शर्टवाली एक व्यक्ती दिसत आहे. व्हिडीओत महेंद्र दळवी दिसत आहेत, समोरची व्यक्ती पोलिसानी शोधावी. मी समोरच्या व्यक्तीलाही ओळखतो म्हणूनच व्हिडीओ ट्विट केला आहे, असे दानवे म्हणाले
राजीनाम्यासाठी व्हिडिओ टाकला नाही
मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. आम्ही ५० खोके एकदम ओके म्हणताना त्यांना राग येत होता. आता हे ५० खोकेच आहेत. या लोकांनी सत्ता आणि संपत्तीचा हैदोस घातला आहे. पोलिसांना आपण सांगितले तर पोलिस चौकशी करतील. मी काय वेगळे आरोप करत नाही करणारही नाही. मला फक्त महाराष्ट्राला हे दाखवायचं आहे, असे दानवे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.