

CCTV backup in EVM room is full
वैजापूर पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ज्या केंद्रावर सुरक्षितपणे आणि सीलबंद स्थितीत ठेवण्यात आली आहेत, त्या मतपेटी पक्षाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बॅकअप पूर्ण क्षमतेला पोहोचला होता. प्रणालीचा सततचा व्हिडिओ रेकॉर्ड राखण्यासाठी नवीन हार्ड डिस्क बसविणे अत्यावश्यक झाल्याने ही प्रक्रिया सोमवारी (दि.८) दुपारी १२ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या देखरेखीखाली पार पडली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जन्हाड उपस्थित होते. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, यासाठी प्रशासनाकडून पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीत जुन्या हार्ड डिस्कची अधिकृत सीलिंग प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरच नवीन हार्ड डिस्क सीसीटीव्ही प्रणालीत बसविण्यात आली. दरम्यान, उमेदवार प्रतिनिधींनी पारदर्शकता पाळावी अशी मागणी केली होती.
प्रशासनानेही ही मागणी मान्य करून जुनी हार्ड डिस्क काढण्यापासून ते सील करण्यापर्यंत आणि नवीन हार्ड डिस्क बसविण्यापर्यंतचे सर्व टप्पे कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. तसेच पंचनामाद्वारे संपूर्ण नोंद लेखी स्वरूपात ठेवण्यात आली. नवीन हार्ड डिस्क बसवल्याने सीसीटीव्ही बॅकअपची क्षमता वाढली असून, आगामी मतमोजणीपर्यंत संपूर्ण परिसर अखंड देखरेखीखाली राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षितता, पारदर्शकता आणि शंका-कुशंकांना वाव न देता ही प्रक्रिया काटेकोरपणे पूर्ण केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.