

Seized Haiwa looted from Tehsil office
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महसूलपथकाने दोन ब्रास वाळूसह जप्त केलेला एक हायवा तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरट्याने १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान वाळूसह चोरून नेल्याचा प्रकार समोर आला असून, प्रशासनाच्या ताब्यातील हायवा तहसील कार्यालयातूनच लंपास झाल्याने वाळूमाफियांचा धाक व प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाळूची चोरटी वाहतूक करणारा हा हायवा महसूल पथकाने सातारा येथून १२ नोव्हेंबर रोजी जप्त केला होता. तो हायवा (एमएच २० ईएल ६०५८) तहसील कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आला होता. मात्र चोरट्याने तो हायवा १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान वाळूसह चोरून नेला. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी रघुनाथ काजे यांनी गुरुवारी (दि. २०) सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या आधीही अशी वाहने लंपास झाल्याच्या घटना घडल्या असून, सुरक्षा यंत्रणा किती प्रभावी आहे यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान जिल्ह्यात गौण खनिजाच्या रॉयल्टीतून अपेक्षित महसूल मिळत नसल्याचे चिंताजनक चित्र समोर आले असून, अवैध उत्खनन आणि चोरटी वाहतूक रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची वस्तुस्थिती आली आहे.
राज्य महसुलाचा मुख्य स्त्रोत मानल्या जाणाऱ्या गौण खनिज महसुलीसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले आहे. एप्रिलपासूनच वसुलीवर भर देणे अपेक्षित होते. मात्र ऑक्टोबर अखेरपर्यंत केवळ ३८ कोटी ७८ लाख रुपयांचीच वसुली झाल्याची माहिती जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. उद्दिष्टाच्या तुलनेत ही वसुली केवळ २५.८५ टक्के असून, शिल्लक साडेचार महिन्यांत उद्दिष्ट गाठणे आव्हानात्मक ठरणार आहे. तसेच अवैध वाळू उपसा रोखणे, महसूल वाढवणे आणि जप्त वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही मोठी आव्हाने प्रशासनासमोर आहेत.
१५ गुन्हे दाखल
अवैध खनिज उत्खननप्रकरणी गंगापुरात १, वैजापुरात ३, शहरात १, कन्नड येथे ३, सिल्लोड आणि सोयगावात प्रत्येकी १, तर फुलंब्रीत ५ अशा एकूण १५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
केवळ १०० कारवाया
जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि चोरट्या वाहतुकीविरुद्ध एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत केवळ १०० कारवाया करण्यात आल्या. पैठण तालुक्यात सर्वाधिक २५, तर वैजापूर १८, शहरात १५ आणि गंगापूरमध्ये १० कारवाया करण्यात आल्या. या कारवायांतून २ कोटी २२ लाखांचा दंड लावण्यात आला. त्यापैकी १ कोटी ३२ लाखांची वसुली झाली. तसेच १०५ वाहने आणि दोन यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.