

Two-wheeler theft for liquor on the rise every day, crime branch arrests
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारूसाठी दररोज जालन्याहून शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला पथकाने बेड्या ठोकल्या. कृष्णा नारायण मुरडकर (२७, रा. वालसावंगी, ता. भोकरदन) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी शुक्रवारी (दि.२१) दिली.
अधिक माहितीनुसार, शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज विविध भागांतून दुचाकी चोरीच्या घटना समोर येत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी काही दिवस नाकाबंदीची मोहीम राबवली. दरम्यान, शहरात येऊन दुचाकी चोरी करणारा आरोपी तांत्रिक तपासात गुन्हे शाखेने निष्पन्न केला. कृष्णा मुरडकर हा वालसावंगी येथे असल्याची माहिती मिळताच गुरुवारी एपीआय रविकांत गच्चे यांनी पथकासह धाव घेत त्याला ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केली असता हसूल भागातून दोन दुचाकी चोरीची त्याने कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी मिळून आल्या. ही कारवाई प्रभारी पोलिस आयुक्त वीरेंद्र मिश्र, डीसीपी रत्नाकर नवले, एसीपी वसुंधरा बोरगावकर, निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रविकांत गच्चे, सहायक फौजदार दिलीप मोदी, जमादार प्रकाश गायकवाड, शेख नवाब, अमोल शिंदे, अशरफ सय्यद, विजय घुगे यांच्या पथकाने केली.
७० ते ८० दुचाकी चोरीचा अंदाज
कृष्णा मुरडकर हा सराईत गुन्हेगार असून, तो दररोज दुचाकी चोरी करत असल्याचे समोर आले आहे. शहरातून आतापर्यंत त्याने ७० ते ८० दुचाकी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
दुचाकीची अवघ्या २ हजारांत विक्री
कृष्णा मुरडकरला दारूचे प्रचंड व्यसन असून, पैशासाठी तो दुचाकी चोरी करतो. त्याच्यावर जालना जिल्ह्यात दरोडा व अन्य गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. चोरलेल्या दुचाकी तो ग्रामीण भागात अवघ्या २ ते ५ हजारांत विक्री करत असल्याचे समोर आले आहे.