

Ajanta Caves Trip is Unforgettable for All of Us: A.D. Verdiyo
सागर भुजबळ
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा लेणीची सफर आम्हा सर्वींसाठी अविस्मरणीय ठरली. अजिंठा लेणीतील वास्तूरचना ही पौराणिक कलेचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम आहे. भारताचा उज्ज्वल इतिहास जाणून घेण्यासाठी जगाने अजिंठा लेणी जरूर पाहिली पाहिजे. अजिंठा लेणी जितकी भव्य आहे, तितक्याच चांगल्या प्रकारे भारतीय पुरातत्व विभागाने ती स्वच्छ व सुंदररीत्या जतन करून ठेवली आहे, फ्फअसे प्रतिपादन इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे वाणिज्यदूत एडी वदीयो यांनी अजिंठा लेणी सफरीवेळी केले.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत शुक्रवारी (दि.२१) वाणिज्यदूत एडी वदीयो यांच्या नेतृत्वाखाली इंडोनेशीयन दूतावासाच्या ५१ सदस्यांच्या प्रतिनिधीमंडळाने भेट दिली. सकाळी १० वाजता कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत वाणिज्यदूत एडी वदीयो व इंडोनेशीयन प्रतिनिधी मंडळाचे अजिंठा लेणीत आगमन झाले.
यावेळी सर्वप्रथम भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने वाणिज्यदूत एडी वादीयो व इंडोनेशीयन प्रतिनिधी मंडळाचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संवर्धन सहाय्यक अधिकारी मनोज पवार, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील, नायब तहसीलदार चैनसिंग बहुरे मंडळ अधिकारी कल्पना डिघोळे ग्राम महसूल अधिकारी वैभव जाधव, शंकर देवतुळे, महेंद्र वरकड, सहायक गणेश फुकटे, शुभम रावळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलिसांचा बंदोबस्त तैनात
प्रतिनिधी मंडळाच्या आगमनापासून प्रयाणापर्यंत फर्दापूर पोलिस ठाण्याचे सापोनि प्रफुल्ल साबळे, पोउनि चंद्रशेखर पाटील, पो.ना. नीलेश लोखंडे, पोकॉ जगदीश सोन-वणे, योगेश कोळी, भरत कोळी यांच्या पथकाने परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात केला होता. मंडळाने जाणून घेतला इतिहास प्रतिनिधी मंडळाने लेणी क्रमांक १, २, ९, १०, १६, १७ व १९ मधील पुरातन चित्रशैली आणि शिल्पकलेचे अवलोकन करून पर्यटक गाईड अमोद बसोले यांच्याकडून अजिंठा लेणीचा इतिहास, शिल्पकला, चित्रशैली व बौद्धकालीन वारशाची सविस्तर माहिती जाणून घेतली.