

Schoolchildren in Mukundwadi were found with sharp koyta in their hands
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी भागातील प्रकाशनगरात गुन्हेगारी प्रवृत्तीने आता शाळकरी मुलांमध्येही शिरकाव केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका गजबजलेल्या गल्लीत काही अल्पवयीन शाळकरी मुले उघडपणे धारदार कोयता नाचवत असल्याचे व्हिडिओत कैद झाले विशेष म्हणजे चार ते पाच लहान मुलांकडे स्कूलबॅग असल्याचेही दिसून येत आहे.
अगोदर अवैध धंदे, कुख्यात गुंडांमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण असताना आता शाळकरी मुलंही गुन्हेगारीच्या मार्गावर जात असल्याचे भयाण वास्तव समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे अधिक माहितीनुसार, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन ते तीन शाळकरी लहान मुलं एका दुचाकीजवळ उभे आहेत. त्यापैकी एकाच्या हातात मोठा कोयता असून, तो तो हवेत फिरवत असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भररस्त्यातून महिलांची ये-जा सुरू असतानाही या मुलांना कशाचीही भीती वाटत नाही.
उलट, कोयता दाखवून ते परिसरात आपली दहशत असल्याचे भासवत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही लहान मुले शाळेच्या बॅगा घेऊन तिथून जात असताना कोयता बाळगणारी तीन चार मुलंही त्यांच्यासोबतच थांबल्याचे दिसून आले. तिथून जाणाऱ्या महिलांकडे पाहून मुलं उपरोधिकपणे हसताना आणि हातवारे करताना दिसत आहेत.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुकुंदवाडी आणि परिसरात अवैध धंदे आणि गुंडांच्या दहशतीमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना, आता शाळकरी मुलांच्या हातात शस्त्रे दिसू लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले असून, गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी कडक कारवाईची मागणी होत आहे.
स्कूल बॅगमध्ये लपविला कोयता
व्हिडिओमध्ये चार ते पाच मुले दिसत असून त्यांच्या खांद्यावर शाळेच्या बॅगा आहेत. व्हिडिओ काढला जात असल्याचे लक्षात येताच, कोयता हातात असलेल्या मुलाने तो तातडीने दुसऱ्या एका लहान मुलाच्या शाळेच्या बॅगेत लपवला. या प्रकारामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढत असल्याचे भयाण चित्र समोर आले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.५) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची आहे. दरम्यान, माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.