

Scam of Rs 34 lakhs by Gram Panchayat operator
नितीन थोरात
वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मागील दोन वर्षांपासून घोटाळ्यासाठी सर्वाधिक चर्चेत वैजापूर तालुक्यात पुन्हा एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी घेतलेल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या बैठकीत १३ ग्रामपंचायतींचे ३४ लाख ४१ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे.
ग्रामपंचायत संगणक परिचालकाने स्वतःच्या खात्यात ही रक्कम परस्पर वळवून अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून त्याचे नाव अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. या प्रकारामुळे सध्या पंचायत समिती कार्यालयात व तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये खळबळ उडाली असून, ग्रामसेवक व सरपंच यांची झोप उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १७ जुलै रोजी वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कृष्ण वेणीकर यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्राचे काम पारदर्शकता तपासण्याच्या हेतूने आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली.
या बैठकी दरम्यान एक धक्कादायक बाब गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली, ती म्हणजे ग्रामपंचायतीकडून संगणक परिचालकांना (ऑपरेटर) महिनाकाठी दिल्या जाणाऱ्या मानधनात मोठा घोटाळा झाला आहे. ई. स्वाक्षरीद्वारे संबंधित काम करणाऱ्या संस्थांना ही रक्कम पाठविली जाते. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावाने ही ई. स्वाक्षरी असते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवक यांना प्रत्येक व्यवहार झाल्यानंतर संदेश मिळतो.
असे असताना मात्र एका ग्रामपंचायत संगणक परिचालकाने (ऑपरेटरने) ऑपरेटरांच्या मानधनाच्या १३ ग्रामपंचायतीच्या मानधनाची ३४ लाख १९ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या अकाउंट मध्ये वळवल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आगामी काळात या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर येणार आहे.
घोटाळ्याचा सूत्रधार तालुक्यातील एका ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक (ऑपरेटर) म्हणून कर्तव्यावर आहे. त्याने त्याच्या ग्रामपंचायत मध्ये हा प्रकार केला की नाही या बाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याने इतर ग्रामपंचायत मध्ये हा कारभार कसा केला? हा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता हे काम ग्रामसेवकांनी स्वतः करणे बंधनकारक आहे. हा घोटाळा समोर आल्याने अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अधिकारी काय म्हणाले आपले सरकार सेवा केंद्राच्या रकमांचा ताळमेळ घेण्यासाठी मी आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये सदरील गंभीर स्वरूपाची बाब निदर्शनास आली आहे. एकूण ३४ लाख १९ हजार एवढ्या रकमेचा एकूण १३ ग्रामपंचायतींमध्ये हा गैरप्रकार शोधून काढण्यात आला आहे. लवकरच संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.